07 July 2020

News Flash

पालिकेच्या दवाखान्यात प्रतिजन चाचणी

केवळ अर्ध्या तासात करोनाचे निदान शक्य

केवळ अर्ध्या तासात करोनाचे निदान शक्य

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई: करोनाचे अर्ध्या तासात निदान करणारी प्रतिजन (अँण्टीजेन) चाचणी आता पालिकेच्या दवाखान्यात उपलब्ध होणार असून त्यासाठी पालिके ने एक लाख संच (किट) उपलब्ध करून दिले आहेत.

भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने करोनाच्या निदानासाठी प्रतिजन चाचणी करण्यास नुकतीच परवानगी दिली. प्रतिबंधित क्षेत्रातील लक्षणे असलेले, रुग्णांच्या थेट संपर्कात आलेले आणि आरोग्यसेवेत कार्यरत असणारे कर्मचारी यांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. संसर्गाची लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींची तातडीने चाचण्या करून निदान व्हावे यासाठी प्रतिबंधित क्षेत्राच्या जवळच्या पालिका दवाखान्यांमध्ये ही चाचणी उपलब्ध केली जाईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. पालिकेच्या दवाखान्यात यासाठी प्रशिक्षित डॉक्टरपासून इतर आवश्यक सेवा दिल्या जातील.

हे चाचणी संच दक्षिण कोरियास्थित ‘एस डी बायोसेन्सर’ या कंपनीकडून खरेदी केले आहेत. दोन दिवसांत ते मुंबईत आल्यानंतर चाचण्या सुरू होतील, असेही पुढे काकाणी यांनी स्पष्ट केले. चाचणीसाठी ४५० रुपये प्रतिचाचणी दर निश्चित केला असला पालिका त्या मोफत करणार आहे. आयसीएमआरच्या नियमावलीनुसार, नकारात्मक चाचण्या आलेल्यांची खात्री करून घेण्यासाठी पुन्हा आरटीपीसीआर चाचण्या केली जाईल.

प्रतिजन चाचणी म्हणजे काय?

विषाणूच्याभोवती प्रथिनेयुक्त कवच निर्माण होते याला प्रतिजन (अँण्टीजेन) म्हणतात. यातही घशाचे नमुने घेतात. प्रतिपिंडे(अँण्टीबॉडी) प्रतिजनावर आक्रमण करून विषाणूला मारतात. संचामध्ये कृत्रिम प्रतिद्रव्ये असतात. यावर घशाच्या नमुन्याचे द्रव टाकले जाते. यात प्रतिजन असल्यास ते प्रतिद्रव्याशी जाऊन मिळतात. यातून प्रतिजन असल्याची खात्री चाचणीत केली जाते.

करोनाच्या निदानासाठी उपलब्ध चाचण्या

’ आरटीपीसीआर (रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शन)- करोनाच्या निदानासाठी ही सुरूवातीपासून के ली जात आहे. यात नाक, घशाचे नमुने घेतले जातात. चाचणीसाठी तीन ते चार तासाचा कालावधी लागत असून तुलनेने ही महाग आहे.

’ प्रतिपिंड (अँण्टीबॉडी) चाचणी- संसर्गाची बाधा झाल्यास त्याच्याशी प्रतिकार करण्यासाठी शरीरात प्रतिपिंडे तयार होतात. रक्ताच्या चाचणीतून करोना संसर्गानंतर तयार झालेली प्रतिपिंडे शरीरात उपस्थित आहे का याचे निदान केले जाते. चाचणीच्या अचूकतेबाबत वाद सुरू असल्याने ती करोना निदानासाठी वापरली जात नाही.

’ सीबीनॅट चाचणी- क्षयरोगासाठी उपलब्ध असलेल्या जीन एक्सपर्ट तंत्रज्ञानावर आधारित सीबीनॅट यंत्रामध्ये करोनाची चाचणी करता येते. यात  रक्ताची चाचणी केली जात असून याचा अहवाल एका तासात उपलब्ध होतो आणि तुलनेने स्वस्त आहे. मात्र, यासाठी आवश्यक काटिर्र्ज कमी प्रमाणात उपलब्ध आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 4:10 am

Web Title: antigen test at bmc hospital zws 70
Next Stories
1 किरकोळ दुकानदारांना फटकाच
2 देवनार पशुवधगृह जुलैपासून सुरू
3 विजेची तार तुटल्यामुळे गाडीला आग
Just Now!
X