प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हॅनेमनियन होमिओ फाऊंडेशनकडून मोफत औषधवाटप सुरू

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई :  करोनाबाधित रुग्णांच्या सातत्याने संपर्कात असणारे पालिका रुग्णालयांतील आरोग्य कर्मचारी, मृतदेहांचे दहन करणारे कर्मचारी अशा सुमारे ६० हजार कर्मचाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून होमियोपॅथीतील ‘अर्सेनिक अल्बम ३०’ हे औषध हॅनेमनियन होमिओ फाऊंडेशनकडून (एचएचएफ) मोफत दिले जाणार आहे. याची सुरुवात कूपर रुग्णालयापासून सोमवारी करण्यात आली.

करोना विषाणू संसर्गावरील प्रतिबंधात्मक उपाय या औषधाचे चांगले परिणाम दिसून येत असल्याचे अनेक होमियोपॅथी डॉक्टरांनी नोंदविले आहे. तसेच याचे दुष्परिणामही  नाहीत. तेव्हा याचा वापर करण्याची मागणी पालिकेकडे होत होती. त्याला आता पालिकेने परवानगी दिली असून सुरुवातील करोना रुग्णांच्या संपर्कात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असून याचे प्रभावशाली परिणाम दिसून आल्यास रुग्णांवरही वापर करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे एचएचएफचे सहसचिव डॉ. गोपीचंद मेनन यांनी सांगितले.

मुंबईतील ४०० ते ५०० होमियोपॅथी डॉक्टरांच्या मदतीने पालिकेची प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, शहरी आरोग्य केंद्र, दवाखाने, प्रसूतीगृहे यातील परिचारिकांसह आरोग्य कर्मचारी,  मृतदेह हाताळणारे स्मशानभूमीतील कर्मचारी अशा ६० हजार कर्मचाऱ्यांपर्यत औषध पोहचविण्यास एचएचएफने सुरुवात केली आहे. सोमवारी कूपर रुग्णालयात १२०० बाटल्या दिल्या असून मंगळवारी केईएम आणि कस्तुरबामध्ये याचे वाटप के ले आहे. संपूर्ण कुटुंबासाठी औषधे दिली जात आहेत.

डॉक्टरांकडून औषधे घ्या

अर्सेनिक अल्बम ३० हे श्वसनसंस्थेवरील आजारांसाठी होमियोपॅथीमध्ये गुणकारी मानले जाते. या औषधामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता फार कमी असल्याने याचा  प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापर करण्याची आयुष मंत्रालयाने शिफारस केली आहे. अर्सेनिक अल्बम हे मूलद्रव्य असून पाण्यासोबत ३० वेळा मिश्रण करून सौम्य केले असल्याने प्रत्यक्ष औषधामध्ये मूळ द्रव्याचा अंश शिल्लक नसतो. त्यामुळे याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता नाही. म्हणूनच याचा वापर सरसकट करण्यास हरकत नाही. परंतु अलीकडे याबाबत भेसळ करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. १० रुपयांची बाटली अगदी ७० रुपयांना विकण्याचे प्रकारही सुरू आहेत. तेव्हा होमियोपॅथी डॉक्टरांकडून हे औषध घेण्याचा सल्ला डॉ. मेनन यांनी दिला आहे.

वैद्यकीय अभ्यासासाठीही नोंद

औषधे पुरवण्यासह याचा वैद्यकीय अभ्यासही करण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला एक प्रश्नावली दिलेली आहे. ज्यात दर दिवशीचे काही बदल जाणवल्यास नोंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. महिनाभराने या प्रश्नावलीसह यानंतरही किती कर्मचारी करोनाबाधित आढळले याची नोंद केली जाईल, असे डॉ. मेनन यांनी स्पष्ट केले.