मुंबई : देशात सात टप्प्यांत, तर महाराष्ट्रात पाच टप्प्यांत लोकसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदानाचे यंत्र, साहित्य व मतदान पथकांना मतदान केंद्रापर्यंत नेऊन सोडण्याचे आणि निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना परत घेऊन आणण्याची जबाबदारी राज्य परिवहन (एसटी) महामंडळावर सोपविण्यात आली आहे. यासाठी एसटी बसचे आरक्षण करण्यात आले असून, राज्यातील पाच टप्प्यांतील मतदानासाठी सुमारे नऊ हजार एसटी बस धावत आहेत.
एसटी महामंडळाला प्रत्येक बसमागे २४ ते ३० हजार रुपये मिळणार आहेत. दोन टप्पे झालेत. आता राज्यात तिसरा टप्पा हा ७ मे रोजी होणार असून यात ११ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. राज्यात मतदानाचा चौथा टप्पा १३ मे रोजी पार पडणार आहे.
पाचव्या टप्प्यात २० मे रोजी एकूण १३ मतदारसंघांत मतदान होत असून, मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघासाठी १२७ बसचे आरक्षण करण्यात येणार आहे. पालघर २५४ बस, ठाणे, भिवंडी, कल्याण ६५ बस, नाशिक आणि दिंडोरी ५१५ बसची मागणी करण्यात आली आहे. धुळ्यासाठी २०० बसची मागणी एसटी महामंडळाकडे केली आहे .
हेही वाचा: विधान भवन, नया नगर, मरोळमधील भूखंडांचा एमएमआरसी विकास करणार, जूनमध्ये निविदा प्रसिद्ध करणार
मतदानापूर्वी प्रशासनाने सर्वच तयारी पूर्ण केली आहे. निवडणुकीच्या कामात व्यत्यय येऊ नये, यासाठी मतदानाच्या दिवशी आणि आदल्या दिवशी एसटी बसची फेरी धावणार आहे.