08 August 2020

News Flash

निमित्त : चतुरंग एक प्रयोगशील संस्था

चतुरंगने गेल्या ४२ वर्षांत विविध प्रकारच्या ५८ उपक्रमांद्वारे सुमारे १५०० कार्यक्रम साकारले आहेत.

चतुरंग प्रतिष्ठान

चतुरंग प्रतिष्ठान

समाजातील त्रुटी, उणिवा, कमतरता लक्षात घेऊन ती कसूर भरून काढण्यासाठी असंख्य हात आपापल्या परीने झटत असतात. अशाच हातांची मोट बांधून सामाजिक संस्था उदयास येते. यातील काही संस्था एखाद्या वंचित घटकाच्या प्रगतीसाठी कार्यरत राहतात तर काही समाजालाच नवीन दिशा देण्यासाठी धडपड करतात. मुंबईत तर अशा अगदी ब्रिटिश काळापासूनच्या संस्था आजही आपले काम इमानेइतबारे करत आहेत. अशाच संस्थांच्या कार्याचा आढावा घेणारे हे पाक्षिक सदर..

मुंबईतील गिरणगावात सुरू झालेली आणि कालांतराने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवणारी ‘चतुरंग प्रतिष्ठान’ ही संस्था. या संस्थेतून जन्माला आलेली आणि नाटय़क्षेत्रात मानाची समजली जाणारी स्पर्धा म्हणजेच सवाई एकांकिका. या स्पर्धेला यंदा ३० वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्ताने चतुरंग संस्थेचा आढावा घेणारा हा लेख.

संगीत, नाटय़, शिक्षण, सांस्कृतिक, साहित्य या क्षेत्रांमध्ये मुशाफिरी करणाऱ्या चतुरंग प्रतिष्ठानची स्थापना १९७४ साली झाली. कोकणातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी सुरू केलेल्या या संस्थेच्या कामात अनेक मानाचे तुरे खोवले गेले आहेत. १९८८ मध्ये सुरू झालेली सवाई एकांकिका स्पर्धा ही त्यापैकी एक. या स्पर्धेने महाविद्यालयीन नाटय़कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले. आज नाटय़-चित्रपट क्षेत्रात स्थिरावलेले अनेक कलाकार ‘सवाई’ची देणगी आहेत. दरवर्षी २५ जानेवारी रोजी आयोजित केली जाणारी ही स्पर्धा नाटय़रसिकांसाठी मेजवानी असते. २५ जानेवारीच्या रात्री सुरू होणाऱ्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दुसऱ्या दिवशी, प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाने होतो. रात्रभर सुरू असणाऱ्या एकांकिका, त्यासाठी गर्दी करणारे रसिकप्रेक्षक, खचाखच भरलेले सभागृह असे वातावरण हीच सवाईची ओळख आहे.

या स्पर्धेचा दर्जा वाढविण्यासाठी चतुरंगच्या फळीने अनेक उत्तमोत्तम प्रयोग केले. सुरुवातीच्या काळात सवाई एकांकिकेच्या प्राथमिक फेरीचे परीक्षण या एकांकिकेच्या चमूमधील प्रतिनिधी करीत असे. सुमारे ३० एकांकिकांचे ३० प्रतिनिधी प्राथमिक फेरीतून सर्वोत्कृष्ट नऊ एकांकिकांची निवड करीत असत. कालांतराने त्यात बदल होत गेला. सवाईमध्ये सहभागी होण्यासाठी त्या वर्षांत झालेल्या किमान एका एकांकिका स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावणे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्यभरातील उत्कृष्ट एकांकिकांमधून निवडलेली सर्वोत्कृष्ट एकांकिका हे सवाई एकांकिका स्पर्धेचे वैशिष्टय़ आहे. नाटक, चित्रपट आणि साहित्य क्षेत्रांतील अनेक मान्यवर या स्पर्धेला आवर्जून हजेरी लावतात.

सवाई एकांकिका स्पर्धेबरोबरच दिवाळी पहाट हा नवा पायंडा चतुरंगने सुरू केला आहे. चतुरंगची पहिली दिवाळी पहाट १९८६च्या दिवाळीत दादरच्या शिवाजी मंदिर नाटय़गृहात पार पडली. दिवाळीमध्ये पहाटे नाटक-संगीताची सुरेल मेजवानी, सर्वत्र दिव्याची आरास, फटाके, अत्तरगंध, रांगोळी, आकाशकंदील आणि त्याबरोबरच फराळ हे चतुरंगच्या दिवाळी पहाटचे स्वरूप. त्यानंतर अनेकांनी दिवाळी पहाटचा कित्ता गिरवला. मात्र चतुरंगने सुरू केलेली दिवाळी पहाट कायम चाहत्यांचा आकर्षणाचा विषय राहिली.

कोकणातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत म्हणून पुस्तके, वर्तमानपत्रे, अभ्यास वर्गही चतुरंगकडून राबवण्यात येतात. याखेरीज शाळासाहाय्य योजना, नाताळ अभ्यासक्रम, व्यवसाय मार्गदर्शन, कपडे-दूध वाटप योजना, निर्धार वर्ग अशा विविध उपक्रमांतून चतुरंग नेहमीच चर्चेत असते.

चतुरंगने गेल्या ४२ वर्षांत विविध प्रकारच्या ५८ उपक्रमांद्वारे सुमारे १५०० कार्यक्रम साकारले आहेत. त्यासाठी वापरलेल्या स्थळ-ठिकाणांची संख्या १९० पेक्षा जास्त आहे, तर ९००हून अधिक नामांकित कलाकार, मान्यवरांची अशा कार्यक्रमांना हजेरी लागली आहे. सध्या ५८ पैकी २८ उपक्रम आजही सुरू आहेत. मुंबईतील गिरगावात सुरू झालेल्या चतुरंग प्रतिष्ठानची शाखा आज डोंबिवली, पुणे, चिपळूण, रत्नागिरी, गोवा या शहरांमध्येही वाढली आहे.  विद्याधर निमकर, मेघना काळे, किरण जोगळेकर, अजित आगवेकर, विनायक काळे, अजित जोशी, नीलिमा भागवत, अजित आगवेकर, श्रीकुमार सरज्योतिषी, वरदा बिवलकर ही कार्यकर्त्यांची फळी चतुरंगचा कारभार सांभाळत आहे.

जीवनगौरव पुरस्कार

विविध क्षेत्रांत निरपेक्षपणे कार्यरत असलेल्या व्यक्तीचा कृतज्ञ भावनेने केलेला गौरव म्हणजे चतुरंगचा जीवनगौरव पुरस्कार. गेल्या अनेक वर्षांत अनेक संस्थांनी जीवनगौरव पुरस्कार सुरू केला आहे. मात्र या पुरस्काराचा पायंडा चतुरंगने केला आहे. या पुरस्काराचे ‘जीवनगौरव’ हे नाव पु. ल. देशपांडे यांनी सुचवले होते. सुधीर फडके (१९९६), प्रा. राम जोशी (१९९७), बाबासाहेब पुरंदरे (१९९८), पांडुरंगशास्त्री आठवले (१९९९), लता मंगेशकर (२०००), बॅरिस्टर पी. जी. पाटील (२००१), श्री. पु. भागवत (२००२), नानाजी देशमुख (२००३), डॉ. जयंत नारळीकर (२००५), नटवर्य भालचंद्र पेंढारकर (२००६), साधना आमटे (२००७), पंडित सत्यदेव दुबे (२००८), डॉ. अशोक रानडे (२०१०), शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी (२०११), विजया मेहता (२०१२) यांसारख्या अनेकांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  गेल्या वर्षी मूर्तीशास्त्र आणि मंदिर स्थापत्यशास्त्रतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

एक कलाकार, एक संध्याकाळ

हे चतुरंगच्या कलादालनातील आणखी एक पुष्प. एका संध्याकाळी गच्चीवर जमा झालेल्या अभ्यासू प्रेक्षकांसोबत कलाकारांच्या रंगलेल्या गप्पा या उपक्रमाचे अनेकांकडून कौतुक झाले. या उपक्रमात कलाकाराची संकल्पना व्यापक ठरवून केवळ साहित्य, चित्रपट, संगीत या क्षेत्रापुरते सीमित न राहता शैक्षणिक, संशोधन, अर्थ या क्षेत्रांतील मान्यवरांचाही समावेश करण्यात आला. येथे प्रेक्षकांसाठी खुले व्यासपीठ असते. पहिली संध्याकाळ १९८४ साली सुरू झाली. त्या वेळी केवळ ६० प्रेक्षक उपस्थित होते. मात्र हळूहळू या खुल्या गप्पागोष्टी लोकांना आवडू लागल्या आणि गच्चीवर सुरू झालेला छोटेखानी कार्यक्रम मोठय़ा स्वरूपात राबवला जाऊ  लागला. त्यानंतर सायंकाळी एक रांगोळी, निमित्तसंध्या, मुक्तसंध्या यांसारखे कार्यक्रमही राबविण्यात आले.

मीनल गांगुर्डे – meenal.gangurde8@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2018 12:29 am

Web Title: article about chaturang pratishthan
Next Stories
1 मुंबईतील वृद्ध दाम्पत्याचे इच्छामरणासाठी राष्ट्रपतींना पत्र
2 मुंबईतील अंधेरीत लाकडाच्या गोदामाला भीषण आग, आगीचे सत्र सुरुच
3 ‘मुंबई शॉपिंग फेस्टीव्हल’ रूपाने भरणार खरेदीचा भव्य मेळा
Just Now!
X