रायगड जिल्ह्यातील उंदेरी किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेदरम्यान खडकात तोफ सापडली आहे. पुढील महिन्यात ५ जानेवारी रोजी या तोफेला सागवानी तोफगाड्यात बसवण्यात येणार आहे. किल्ल्यावर आतापर्यंत १६ तोफा होत्या. त्यांची संख्या १७वर पोहोचली आहे.

सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. ६ डिसेंबर रोजी अलिबागजवळील उंदेरी किल्ल्यावर प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता करताना किल्ल्याच्या बाहेरील खडकात एक तोफ निदर्शनास आली. पूर्वीच्या नोंदीप्रमाणे किल्ल्यावर १६ तोफा होत्या. आता किल्ल्यावरील एकूण तोफांची संख्या ही १७ झाली आहे.

किल्ल्यावर इ.स.१६७०-७८ पासून इंग्रज-मराठ्यांच्या लढाईदरम्यान या किल्ल्याचा खांदेरीवरील मराठ्यांचे बांधकाम रोखण्यासाठी इंग्रजांनी उंदेरीचा बांधकाम करून वापर केला. तसेच मराठे व सिद्दी यांच्यातही खांदेरी उंदेरीवर लढाया झाल्या. तर सिद्दी जोहरनं काहीकाळ हा किल्ला आपल्या ताब्यात ठेवला होता. सरलेख कान्होजी आंग्रे यांच्या काळात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. हा किल्ला समुद्रातील आक्रमणापासून संरक्षण दृष्टीने लष्करी शस्त्राने सज्ज होता.बऱ्याच तोफा किल्ल्यावर असल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. प्रतिष्ठानमार्फत ५ जानेवारी २०२० रोजी दोन तोफांना सागवानी तोफगाडे अर्पण करण्यात येणार आहेत. प्रतिष्ठानचे अलिबाग विभागाचे अध्यक्ष संजय पाडेकर यांनी ही माहिती दिली.

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्रातील गडकिल्ले संवर्धनासाठी महाराष्ट्रभर कार्य करते. संस्थेचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्र्भर गेल्या दहा वर्षांपासून दुर्ग संवर्धन केलं जात आहे. जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी राष्ट्रध्वज लावण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला होता. तसेच पद्मदुर्ग, कोर्लई, कुलाबा या किल्ल्यांवर तोफांच्या संवर्धनाच्या दृष्टीने पुरातत्व विभागाच्या परवानगीने ११तोफांना सागवानी तोफगाडे पुरातत्व निकषाने लावण्यात आले.