विविध उपक्रम राबविणार; आर्थिक मदतीचे आवाहन
ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत, इतिहासाचे अभ्यासक आणि एशियाटिक सोसायटीचे माजी अध्यक्ष दिवंगत डॉ. अरुण टिकेकर यांची स्मृती जपण्यासाठी एशियाटिक सोसायटीतर्फे ‘डॉ. अरुण टिकेकर स्मृती निधी’ची स्थापना करण्यात आली आहे. डॉ. टिकेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सोसायटीतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येणार असून सोसायटीने त्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
सोसायटीचे सदस्य आणि नंतर अध्यक्ष या नात्याने डॉ. टिकेकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत सोसायटीसाठी प्रतिष्ठेचे ठरतील असे अनेक उपक्रम व योजना सुरू केल्या. २००८ ते २०१८ या कालावधीसाठीचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ त्यांनी तयार केले होते. मुंबईच्या इतिहासात आणि एशियाटिक सोसायटीच्या जडणघडणीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, अशा व्यक्तींची व संस्थापकांची चरित्रे सोसायटीतर्फे प्रकाशित करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम त्यांनी सुरू केला. या अंतर्गत काही चरित्रे प्रकाशित झाली आहेत. काही मान्यवरांच्या नावाने सामाजिक, शैक्षणिक, इतिहास आदी विषयांवर व्याख्याने सुरू केली. मुंबई संशोधन केंद्राची स्थापना, जुन्या व दुर्मीळ ग्रंथांचे जतन व डिजिटलायझेन आदी उपक्रमही त्यांनी सुरू केले. वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन यासाठी त्यांनी ‘लिटरेचर क्लब’ही सोसायटीत सुरू केला होता.
एशियाटिक सोसायटीच्या कार्यातही डॉ. टिकेकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या स्मृतीचे जतन करण्यासाठी सोसायटीतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ‘स्थानीय इतिहास’ या विषयावर मुंबई संशोधन केद्रातर्फे दरवर्षी व्याख्यानमाला आयोजित करण्याचा निर्णय सोसायटीच्या व्यवस्थापन समितीने घेतला आहे. काही नामांकित शिक्षण संस्थांचे सहकार्य या उपक्रमास लाभणार आहे. ‘मानवता’ या विषयात पदव्युत्तर उच्च शिक्षण व संशोधन करणाऱ्यांसाठी डॉ. अरुण टिकेकर यांच्या नावाने शिष्यवृत्तीही देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी सदस्य, साहित्यप्रेमी, दानशूर व्यक्ती आणि संस्था यांनी ‘डॉ. अरुण टिकेकर स्मृती निधी’साठी आर्थिक मदत करावी.