एक्सीस बॅंकेच्या कुलाबा येथील एटीएम सेंटरमध्ये स्किमर उपकरण लावून नंतर लाखो रुपये लंपास करणाऱ्या आरोपींची ओळख पटली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेले हे दोन्ही आरोपी बल्गेरीयन असून त्यांच्यावरील कारवाईची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कुलाबा येथील एटीएम सेंटरमध्ये या दोन्ही आरोपींनी ७ ते २९ मे या कालावधीत स्किमर उपकरण बसविले होत़े  या उपकरणाच्या माध्यमातून एटीएम सेंटरमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या डेबीट कार्डाचा डेटा त्यांनी चोरला होता. या डेटाच्या आधारे बनावट डेबीट कार्ड बनवून ग्रीस मधून लाखो रुपये काढण्यात आले होते.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना दोन तरुण स्किमर उपकरण लावताना आढळले होते. त्याआधारे पोलिसांनी त्यांची छायाचित्रे बनवून त्यांचा शोध सुरू केला होता. हे दोन्ही तरुण बल्गेरिया देशाचे नागरीक असून त्यांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी आहे. तीन महिन्यांच्या व्हिजावर ते मुंबईत आले होत़े  परंतु २० दिवसांतच काम आटोपून ते भारताबाहेर गेले होते. त्यांना भारतात आणून अटक करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.