आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून १६ फेब्रुवारी १९६६ रोजी राष्ट्राची शक्तीया राष्ट्रीय भाषणमालेत बॅ. नाथ पै यांचे भाषण झाले होते. त्या भाषणातील काही भाग. 

कला वक्तृत्वाची – बॅ. नाथ पै

Tamil Nadu news M. K. Stalin
तमिळनाडूत यंदा तिरंगी लढतीची शक्यता; द्रमुक, अण्णाद्रमुक अन् भाजपामध्ये सामना होणार
Anti-Maoist operations in India influence of Naxalism
छत्तीसगडमध्ये १८ नक्षलींचा खात्मा; देशात कुठे आहे नक्षलवादाचा प्रभाव?
raj thackeray mns padwa melawa
फडणवीस म्हणतात “पाठिंब्याची अपेक्षा”; महायुतीच्या नेत्यांची सकारात्मक विधानं, पण राज ठाकरेंची नेमकी भूमिका काय?
AIMIM chief Asaduddin Owaisi criticised India Bloc Loksabha Election 2024
मुस्लीम गुलाम व्हावेत ही धर्मनिरपेक्ष पक्षांची इच्छा – ओवैसी

लोकशक्ती हाच लोकशाहीचा पाया असतो. सर्व सत्तेचे उगमस्थान लोक हे असते आणि सत्तेचा संचयही लोक या घटकातच होत असतो. खऱ्या लोकशाहीची ही एक मूलभूत कल्पना आहे. जुन्या काळात लोकशाहीच्या या जाणिवेने अभिमंत्रित झालेली मंडळी होती तशी ती आजच्या काळातही आपल्याला आढळतात. लोकांची शक्तीच अखेर यशस्वी होते हे आपल्याला काही नवे नाही. जुन्या काळात आणि आधुनिक काळात हे आपल्या देशातील अनेक विचारवंतांनी सांगून ठेवले आहे. लोकशक्ती ही राज्यशक्तीपेक्षा प्रभावी असते.

आपले संविधान, आपली घटना हाच विश्वास, हीच श्रद्धा व्यक्त करते. शक्ती आणि सत्ता यांचे उगमस्थान जनता, लोक हेच आहे आणि तेच सत्तेचेही अधिष्ठान आहे. संचयस्थान आहे. आपली घटना, आपले संविधान हीच आपल्या स्वराज्याची सनद आहे, ग्वाही आहे. आपल्या स्वातंत्र्याचे ते संरक्षक कवच आहे. कधी स्वार्थान्ध, मतान्ध मंडळी, जगाच्या इतिहासात उठणाऱ्या प्रचंड लाटांचे भान नसणारी मंडळी, अज्ञानी मंडळी, लोकशक्तीला थोपविण्याचा आटापिटा करताना दिसतात, तिला पराभूत करण्याचा उद्योग करतात. पण त्यांनी उभ्या केलेल्या सगळ्या तटबंद्या लोकशक्तीपुढे धडाधड कोसळून पडतात. सगळे अडथळे लोकशक्तीच्या पुरात कुठल्या कुठे वाहून जातात. त्यातूनच क्रांतीचा उदय होतो. प्रचंड परिवर्तन आकाराला येते.

जागृत लोकशक्तीच्या मतपरिवर्तनकारी दडपणामुळे स्वतंत्र भारतात राजकीय, आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील किती तरी निर्णय हटवादी राज्यकर्त्यांना बदलावे लागले आहेत. लोकशक्तीचा अंतिम विजय निश्चित आहे, असे म्हणताना त्यात काहीच खाचखळगे नाहीत, अडथळे नाहीत, अडचणी नाहीत असे मला म्हणायचे नाही. लोकशक्ती आपोआप विजयी होते अशी समजूत कोणी करून घेऊ नये. पूर्वग्रह आणि भोळ्या समजुती, अज्ञान आणि अपसमज या गोष्टी अडचणी निर्माण करतात. काही वेळा लोककल्याण आणि जनतेची इच्छा यांच्या नावाखालीदेखील लोकशाहीला घातक अशी पावले टाकली जातात. अनेकदा लोकशक्तीचा वापर सामाजिक, राजकीय व आर्थिक परिवर्तन आणि न्याय धाब्यावर बसविण्यासाठी केल्याचेही दिसते. लोकांनी दडपशाहीला सिंहासनावर बसविले, एवढेच नव्हे तर ती दडपशाही चालू ठेवण्यासाठी साहय़ केले, असे दाखले दुर्मीळ नाहीत. ह्या अशा उदाहरणांमुळेच लोकशक्तीबद्दल लोकांची श्रद्धा भंग पावते आणि मग कडवटपणे ते लोकशक्तीबद्दल अद्वातद्वा बोलतात. लोकशाहीच्या कल्पनेबद्दल अशी मंडळी संशय व्यक्त करताना दिसतात. लोकांना सतत जागरूक ठेवणे, त्यांचे शिक्षण करणे, त्यांना सर्व अंगांनी विचार करायला शिकवणे हा लोकशाहीच्या अनुषंगाने पोसल्या जाणाऱ्या अनाचारांवर रामबाण इलाज आहे.

लोकशाही हे सामाजिक व आर्थिक न्यायप्रस्थापनेचे एक प्रभावी साधन आहे, असा दावा करणाऱ्यांचे हे कर्तव्य आहे की सत्तेचा दुरुपयोग रोखण्यासाठी लोकांनी सतत सबळ आणि तत्पर असले पाहिजे. ही जाणीव त्यांनी निर्माण करावी.

असे सुजाण, संघटित लोकमत असेल तरच सत्तेला अंकुश लावता येतो आणि लाचलुचपतीने बरबटलेला कारभार नेस्तनाबूत करणे शक्य होते. लोकशाहीच्या यशाचे ते गमक आहे. नेत्याने लोकांची भाबडेपणाने भलावण करणे किंवा लोकमतापुढे लोटांगण घालणे म्हणजे लोकशाही नेतृत्व नव्हे. लोकशाही नेतृत्वाची कसोटी लोकांच्या व्यापक व उचित आकांक्षांशी ते किती एकरूप होते आणि त्यासाठी प्रसंगी तात्पुरती माघार व अपयश घेण्याची तयारी दाखवते यावर लागते. लोकांच्या पूर्वग्रह व अपसमजुतींविरुद्ध दंड थोपटण्याची त्याची तयारी असली पाहिजे. यासाठी आपले सर्वस्व समर्पण करण्यालाही त्याने कचरता कामा नये.

(अनुबंध प्रकाशन प्रकाशित ‘वक्तृत्व कला दिग्गजांची’ -श्यामसुंदर उके या पुस्तकावरून साभार)

लोकेच्छेपुढे राज्यकर्त्यांची शरणागती

सत्ताधाऱ्यांना सत्तेचा पुष्कळदा मद चढतो, मस्ती येते. लोकशक्तीला ते क:पदार्थ समजतात. लोकशक्तीची अवहेलना करतात. तिला तुच्छ लेखतात. पण लोकशक्ती त्यांना नमवते. सरळ मार्गावर आणते. आपल्या उर्मटपणाचा त्यांना त्याग करावा लागतो. शिरजोरी, मुजोरी त्यांना सोडावी लागते. इतिहासात अशी कितीतरी उदाहरणे सापडतील की जेथे राज्यकर्त्यांना आपला हट्ट सोडून देऊन लोकेच्छेपुढे शरणागती पत्करावी लागली आहे.

प्रायोजक : ‘लोकसत्ता’ आयोजित आणि ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत व पॉवर्ड बाय ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘द विश्वेश्वर को-ऑ. बँक लिमिटेड’, ‘आयसीडी’ (इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट), ‘एमआयटी’