भांड यांच्या अध्यक्षतेखालील पहिली बैठक
जेमतेम दोन कोटींच्या तिजोरीनिशी कोटय़वधींची खैरात करावयास निघालेल्या ‘साहित्य संस्कृती मंडळा’च्या हनुमान उडीला पहिल्याच बठकीत लगाम बसला आहे. संघ परिवाराचे महाराष्ट्रातील मुखपत्र समजल्या जाणाऱ्या ‘साप्ताहिक विवेक’ला पाच कोटींचा निधी देण्याचा प्रस्ताव या बठकीत बासनात बांधावा लागला आहे. राज्यातील सात साहित्य परिषदांचे वार्षकि अनुदान पाच लाखांवरून दहा लाखांपर्यंत वाढविण्याची शिफारस मात्र राज्य सरकारला करण्याचे मंडळाने ठरविले आहे.
बाबा भांड यांच्या अध्यक्षतेखालील मंडळाची पहिलीच बठक ३ सप्टेंबरला पार पडली. विदर्भ, पुणे यांच्यासह सात साहित्य परिषदांचे सरकारी अनुदान दहा लाखांपर्यंत वाढविण्याची शिफारस सरकारला करणे हा या बठकीतील चच्रेचा विषय होता. मात्र या परिषदांच्या कामगिरीचा व्यापक आढावा घेतल्याखेरीज अशी शिफारस करणे योग्य नाही, असा सूर काही सदस्यांनी लावला. साहित्य संस्कृती क्षेत्रातील अन्य संस्थांचाही अनुदानासाठी विचार व्हावा, असेही काही सदस्यांनी सुचविले. दहा लाखांच्या अनुदानवाढीचा प्रस्ताव संमत झाला, मात्र सध्याची राज्याची आíथक तसेच दुष्काळी परिस्थिती पाहता शासनानेच योग्य निर्णय घ्यावा, असेही सुचविण्यात आले. पहिलीच बठक असल्याने, अनुदान वा अर्थसाहाय्याबाबतचे निर्णय घाईने घेऊ नयेत, असे या बठकीत ठरले.

‘विवेक’च्या प्रकल्पासाठी पाच कोटींच्या अर्थसाहाय्याची मागणी करणारे पत्र मंडळास मिळाले होते. त्यावर या बठकीत चर्चा झाली होती. असे प्रकल्प मंडळाच्या कार्यकक्षेत नसल्याने त्यावर निर्णय झाला नाही.
– बाबा भांड, अध्यक्ष, साहित्य संस्कृती मंडळ