दोन वर्षांपासून राणीच्या बागेत वास्तव्यास आलेल्या हम्बोल्ट पेंग्विनपैकी मिस्टर बोल्ट आणि फ्लिपर या जोडीने १५ ऑगस्टला एका पिल्लाला जन्म दिला होता. मात्र हे पिल्लू २२ ऑगस्टला दगावले आहे अशी माहिती समोर आली आहे. या पिल्लाला पिसे येऊन ते पोहण्याची शारिरीक क्षमता येण्यासाठी अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार होता. मात्र २२ ऑगस्टला या पिल्लाची प्रकृती ढासळली. पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने या पिल्लाचा जीव वाचावा म्हणून प्रयत्न केले. मात्र २२ तारखेच्या रात्री हे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले.

मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पॅथोलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि पक्षीतज्ज्ञ विभागातील प्राध्यापकांच्या पथकाने २३ तारखेला म्हणजेच गुरूवारी सकाळी ९.३० वाजता प्राणी संग्रहालय रूग्णालयात या पिल्लाचे शवविच्छेदन केले. नवजात पिल्लातील विसंगती आणि यकृतातील बिघाड यामुळे या पिल्लाचा मृत्यू झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

पेंग्विन व्यवस्थापनावरील विविध संदर्भांनुसार बऱ्याचदा अंडी किंवा पिल्ले मृत होण्याचे प्रमाणे हे सरासरी ६० टक्के इतके असते. ज्यामध्ये अंडे फलित नसणे, अंड्यामध्ये पिल्लाची स्थिती योग्य नसणे, अंड्यातून पिल्लू स्वतःहून बाहेर न येणे, पिल्लाला अन्न भरवण्यात त्याच्या पालक पक्षांची असमर्थता, अंड्यातील पिवळा बलक तसाच राहणे अशी अनेक कारणे असू शकतात. त्याचप्रमाणे असोसिएशन ऑफ झूज अँड अॅक्वेरिअर स्पिसिज सर्व्हायवल प्लान आणि हम्बोल्ट पक्ष्यांच्या कृत्रिमरित्या उबविण्यात तसेच वाढवण्यासंबंधीच्या शास्त्रीय प्रबंधान्वये जन्मानंतरचे ३० दिवसापर्यंतच्या पिल्लांचा मृत्यूदर ३० ते ३५ टक्के इतका असतो. आता हे पिल्लू दगावल्याने भारतात जन्माला आलेले पहिलेवहिले पेंग्विनचे पिल्लू दगावले आहे.