बाळासाहेब थोरात यांची टीका; सरकारविरोधी जनजागृतीवर भर

गेल्या पाच वर्षांत राज्य अधोगतीला गेले आहे, शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे, पाच लाख कोटी रुपयांचे कर्ज कशासाठी काढले याचे उत्तर आम्ही राज्यातील भाजप-शिवसेना सरकारकडे मागणार आहोत. आता जनतेमध्ये जाऊन भाजपच्या आभासी विकासाचा पर्दाफाश करू, असा इशारा देत, आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचा मुख्यमंत्री आघाडीचाच असेल असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने सोमवारी थोरात यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी थोरात म्हणाले, काँग्रेसपुढील सध्याची परिस्थिती कठीण व आव्हानात्मक आहे, परंतु ही लढाई विचारांची-तत्त्वांची आहे. जनतेला सोबत घेऊन ही लढाई आम्ही निकराने लढू व जिंकू. १९७८ मध्ये इंदिराजींचा पराभव झाला होता, त्या वेळी काँग्रेस राहणार नाही असेच चित्र निर्माण होते, परंतु १९८० मध्ये पुन्हा काँग्रेसचेच सरकार आले. १९९९ मध्ये केंद्रात व राज्यात भाजप आघाडीचेच सरकार होते. त्या वेळीही तशीच परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु केंद्रात जरी भाजपचे सरकार असले तरी, राज्यात काँग्रेसला सत्ता मिळाली, याची आठवण करून देत, या वेळी लोकसभेचे निकाल काही लागले असले तरी, विधानसभेचे निकाल निराळे लागतील, असे भाकीत त्यांनी वर्तविले.

देशात दोन विचारांचा संघर्ष सुरू आहे. जातीच्या, धर्माच्या नावावर राजकारण करणे सोपे असते, विचारसरणीने काम करणे अवघड आहे, काँग्रेसचा विचार शाश्वत आहे. शेवटी शाश्वत विचारच कायम टिकतो, असे ते म्हणाले.

राज्यातील भाजप-शिवसेनेच्या सरकारने  विकासाचे भ्रामक वातावरण तयार केले आहे, पाच वर्षांत राज्याची मोठी अधोगती झाली आहे.

सत्तेत भागीदार असलेला पक्ष शिवसेनाच शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही म्हणून मोर्चा काढते, याचा अर्थ सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली हे सत्ताधारी पक्षच कबूल करीत आहे. विधानसभेत पीक विम्याबद्दल शिवसेनेच्या एकाही आमदाराने आवाज उठविला नाही, बाहेर मात्र मोर्चा काढतात तेही चुकीच्या विमा कंपनीच्या कार्यालयावर, असा टोला थोरात त्यांनी लगावला.

काँग्रेस आगामी विधानसभा निवडणुका समविचारी पक्षांना बरोबर घेऊन ताकदीने लढेल. राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, भाकप, माकप हे आमचे मित्रपक्ष आहेत, वंचित बहुजन आघाडीलाही सोबत घेऊ, मनसेला बरोबर घ्यायचे की नाही, त्याबाबतचा प्रस्ताव अजून आला नाही, असे त्यांनी सांगितले.