मुलुंड येथील एका सौंदर्य प्रसाधन कंपनीचे संचालक असलेले अंकुर कोराने यांना एक कोटींचा ऑनलाइन गंडा घालण्यासाठी आवश्यक असलेला पासवर्ड हॅक कसा झाला, याबाबत चौकशी करणाऱ्या पोलिसांनी बँकेच्या दक्षता अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. परंतु या बैठकीत या अधिकाऱ्यांकडून पासवर्ड हॅकिंगबाबत फारशी माहिती मिळाली नाही. उलटपक्षी फक्त नन्नाचा पाढा वाचण्याचे काम या अधिकाऱ्यांनी केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
ऑनलाइन व्यवहारासाठी दोन पासवर्ड आवश्यक असतात. एक ग्राहकाचा तर एक बँकेचा. दोन्ही पासवर्ड मिळाल्याविना हस्तांतरण होत नाही. परंतु कोराने यांच्या प्रकरणात हे दोन्ही पासवर्ड मुख्य सूत्रधाराकडे होते. बँकेच्या मदतीविना ते शक्य नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्पष्टीकरण मिळविण्यासाठी दक्षता अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. परंतु पोलिसांच्या हाती फारसे काही लागले नाही. आता संबंधित अधिकारी वा कर्मचाऱ्यांना थेट चौकशीसाठी पोलीस ठाण्यात पाचारण करण्याविना गत्यंतर नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
मुलुंड पोलिसांना आतापर्यंत एक कोटीपैकी ६० लाख रुपये वसूल करण्यात यश आले आहे. मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी मुलुंड पोलिसांची पथके उत्तर प्रदेश तसेच दिल्लीत तळ ठोकून आहेत. चौकशी करताना बँकेकडून फारसे सहकार्य मिळत नसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे अडचणी येत असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. उपायुक्त महेश घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक जिवाजी जाधव अधिक तपास करीत आहेत.