News Flash

सहज सफर : बेधुंद बेकरे!

भिवपुरी म्हटले की आपल्याला आषाणे आणि कोषाणे ही धबधब्यांची जोडगोळीच आठवते.

संग्रहित छायाचित्र

निसर्गाची हिरवी शाल पांघरून बेधुंद जगणाऱ्या कर्जत तालुक्यात वर्षांऋतूत अनेक धबधबे प्रसवतात. नेरळजवळील आनंदवाडी, टपालवाडी, नव्याने तयार झालेला सोलानपाडा, आषाणे-कोषाणे, मोहिली, कोला आदी धबधब्यांवर तर पाऊसमज्जा साजरी करण्यासाठी पर्यटकांची अलोट गर्दी होते. पण काही धबधब्यांची ठिकाणे अशी आहेत की अनेकांना त्याबाबत कमी माहिती आहे किंवा तिथे पर्यटकांची गर्दी कमी असते.. भिवपुरी स्थानकापासून काही अंतरावर असलेला बेकरे धबधबा त्यापैकीच एक.

भिवपुरी म्हटले की आपल्याला आषाणे आणि कोषाणे ही धबधब्यांची जोडगोळीच आठवते. पण पर्यटकांची कमी गर्दी असलेला आणि निसर्गाची मुक्त उधळण असलेला बेकरे गावचा धबधबा या धबधब्यांइतकाच बेधुंद व स्वच्छंद वाटतो. हिरव्याकंच डोंगररांगा, त्यातून खळाळत वाहणारे धबधबे, वाहत्या पाण्याच्या शुभ्र धारा आणि मन प्रसन्न करणारे वातावरण.. यामुळे वर्षांसहल साजरी करण्यासाठीचे हे एक अनमोल ठिकाण आहे.

भिवपुरी रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर पूर्वेला कल्याणच्या दिशेने चालायला सुरुवात केल्यानंतर ३० ते ४० मिनिटांत आपण बेकरे गावात पोहोचतो. बेकरे गावातून धबधब्यापर्यंतचा प्रवास अविस्मरणीय असाच आहे. डोंगरातील पायवाट, भाताची शेते, झाडी-झुडपे, लहान-मोठे झरे यातून प्रवास करताना आणि या परिसरातील निसर्गवैभवाचा आनंद घेताना मन विलक्षण प्रसन्न होते. धबधब्याच्या जवळपास आलात तर पाण्याचा मोठा आवाज येतो, त्या दिशेने जाण्यासाठी आपली पावले आसुसलेली असतात. थोडे पुढे चालत राहिलात तर या लोभसवाण्या धबधब्याचे दर्शन होते. सुमारे ५० फुटांवरून कोसळणारा हा शुभ्र नि दुधाळ धबधबा आपल्याला खुणावतो. त्याच्या धुंद, स्वच्छंद जगण्यात आपणही सामील व्हावे, असा इशाराच जणू तो देत असतो. मग काय, कसलाही विचार न करता आपसूकच आपण या धबधब्याच्या पाण्यात शिरतो आणि चिंब होऊन जातो.

या धबधब्याच्या खाली पाणी साचून एक छोटासा जलाशय तयार झालेला आहे. या नितळ पाण्यात भिजण्यात, डुंबण्यात आणि एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण्यात एक वेगळीच मजा येते. जलाशयात काही खडक असल्याने जरा जपूनच आनंद घ्यावा लागतो. मुख्य धबधब्याजवळ  वरच्या बाजूला आणखी एक लहानसा धबधबा आहे. एक छोटीशी टेकडी पार करून येथे पोहोचलात तर डोंगराच्या कुशीतील हा निर्झरही मनाला आनंद देतो.

एकूणच हा परिसर म्हणजे निसर्गाचे हिरवेकंच लेणेच. माथेरानच्या हिरव्यागार डोंगररांगा येथून दिसतात. या डोंगररांगांतून बाहेर पडणाऱ्या धबधब्यांच्या माळा, रंगीबेरंगी पक्षी, विविध प्रकारच्या वनस्पती आणि धुंद वातावरण यामुळे या परिसरातील पावसाळी सहल अविस्मरणीय अशीच आहे. प्रदूषण आणि शहरी गोंगाटापासून काही वेळ निवांतपणा हवा असेल, तर हे ठिकाण उत्तम असेच आहे.

बेकरे धबधबा कसे जाल?

मध्य रेल्वेवरील भिवपुरी रोड स्थानकावर उतरावे. तेथून पूव्रेला कल्याण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून चालत ४० ते ४५ मिनिटांमध्ये बेकरे गावाजवळ पोहोचतो.

भिवपुरी स्थानकापासून बेकरे गावात जाण्यासाठी रिक्षाची सोय आहे. मात्र तेथून चालतच धबधब्यापर्यंत जावे लागते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 3:54 am

Web Title: bekare dam near bhivpuri
Next Stories
1 रिक्षा-टॅक्सीचालकांना आता विनम्रतेचे धडे!
2 शेलार यांच्या मालमत्तेवर ‘आप’चे बोट!
3 ८७ टक्के विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी!
Just Now!
X