म्युनिसिपल मजदूर युनियनने विविध मागण्यांसाठी १७ जूनच्या रात्रीपासून पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. या आंदोलनात सहभागी होऊन मुंबईकरांना वेठीस धरू नये, असे आवाहन बेस्ट उपक्रमाने कर्मचाऱ्यांना केले आहे.
महापालिका-बेस्ट कर्मचारी, फेरीवाले, रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांसाठी कामगार नेते शरद राव यांनी १७ जूनच्या मध्यरात्रीपासून २० जूनपर्यंत ७२ तासांचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनामुळे मुंबईकरांची अडवणूक होईल. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन बेस्ट उपक्रमाकडून करण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास परावृत्त करणे, धाकदपटशा दाखविणे, प्रवाशांना वाहतूक सेवेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करू नये, असे स्पष्ट आदेश औद्योगिक न्यायालयाने कामगार संघटनांना दिले आहेत. त्यामुळे आंदोलनात सहभागी होऊन प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कडक कारवाई करण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे.