भीमानदीच्या उगमातच प्लास्टिक प्रदूषण
भीमाशंकर मंदिर परिसरातील बेसुमार प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे भीमाशंकर अभयारण्यातील भीमा नदीच्या उगमपात्रावरच घाला घातला आहे. नदीच्या उगमाचा डोंगरातील चार किलोमीटरचा प्रवाह आणि म्हातारबाची वाडी ते भीमाशंकर मंदिर या आठ किलोमीटरच्या पट्टय़ात बेलगाम पर्यटकांनी फेकलेल्या प्लास्टिकमुळे येथील वृक्षराजीच्या भविष्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कॅगच्या ताज्या अहवालात वनक्षेत्रे वाढवण्यासाठी केलेल्या खर्चानंतरही वनक्षेत्रात घट झाल्याबद्दल ओढलेल्या ताशेऱ्यांच्या पाश्र्वभूमीवर भीमाशंकरच्या परिस्थितीची तीव्रता आणखीनच वाढते.
भीमाशंकर मंदिराच्या वरच्या बाजूस भीमा नदीचा उगम होतो व मंदिरामागील देवराईतून डोंगरउतारावरुन तिचा प्रवाह पुढे जातो. प्रस्तुत प्रतिनिधीने या परिसरास भेट दिली असता, याच उगम प्रवाहात प्लास्टिकच्या सर्व प्रकारच्या पिशव्या अनेक वर्षे अडकलेल्या दिसल्या. काही ठिकाणी त्यांचे थरदेखील साचलेले आढळले, तर याच प्रवाहात मोठय़ा प्रस्तरखंडांमध्ये प्लास्टिकच्या अनेक बाटल्या अडकून पडल्या आहेत. इतकेच नाही तर भीमाशंकर गावातील इतर सर्व प्रकारचा कचरादेखील याच प्रवाहात अडकलेला दिसून येतो. त्यामुळे नदीचा प्रवाह उगमातच प्रदूषित होत आहे.
गेल्या काही वर्षांत वाढलेल्या पर्यटकांमुळे उपाहारगृहांची प्रचंड गर्दी झाली आहे. याच उपाहारगृहांनी आणि पर्यटकांनी टाकलेल्या प्लास्टिकमुळे भीमाशंकर एसटी स्टॅन्डच्या मागील डोंगरउताराला कचराकुंडीचेच स्वरूप आले आहे, तर आजूबाजूच्या जंगल परिसरात थर्माकोलच्या प्लेट्सचा खच पडलेला दिसून येतो. काही ठिकाणी तर झाडाच्या बुंध्यातच प्लास्टिकच्या पेल्यांचा ढीग ओतलेला आहे. जंगलातील या प्लास्टिकच्या दुष्परिणामाबद्दल ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर सांगतात, ‘‘मातीत सक्रिय असणाऱ्या जिवाणूंवर याचा परिणाम होतोच, पण कमी जाडीच्या प्लास्टिकमधील रासायनिक घटक मातीत मिसळतात. त्यामुळे जलस्रोतांना धोका आहेच, पण नव्या बीजांकुरांच्या वाढीवर थेट परिणाम होतो.’’
निगडाळे, कोंढवळ ग्रामपरिस्थितिकी समिती, भोरगिरी ग्रामपरिस्थितीकी समिती, याच दोन्ही ठिकाणच्या ग्रामपंचायती, धोरणात्मक बाबींसाठी वनविभाग व जिल्हा प्रशासन अशा शासकीय व निमशासकीय पाच व्यवस्था येथे कार्यरत आहेत, तर मंदिरासाठी देवस्थान समिती आहे. असे असूनदेखील संपूर्ण प्लास्टिक बंदी असलेल्या या पट्टय़ात सर्व प्रकारचे प्लास्टिक मुक्तपणे पसरलेले आहे. अनियंत्रित पर्यटकांनी फेकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, पेले, थर्माकोलच्या प्लेट्स असे सर्व प्रकारचे प्लास्टिक रानोमाळ विखुरले असून हाच कचरा आता हळूहळू जंगलाच्या अंतर्गत भागातदेखील पसरत आहे. त्यामुळेच भीमाशंकरसारखे आशियातील सर्वाधिक वृक्ष प्रजातींची संख्या असलेले हे अभयारण्य प्लास्टिकचे अभयारण्य होत चाललेय, अशी प्रतिक्रिया पर्यावरणतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

प्लास्टिक हटवणार कोण?
गेल्या दहा वर्षांत भीमाशंकरला येणाऱ्या धार्मिक पर्यटकांमध्ये प्रचंड वाढ झाली असून वर्षांला किमान १० लाख पर्यटक येथे येत असतात. पर्यटकांची रहदारी असणाऱ्या या परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी ग्रामपरिस्थितीकी समितीवर असून त्या बदल्यात येणाऱ्या पर्यटकांकडून कर जमा करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. वनखात्याच्या सांगण्यानुसार या सर्व परिसरातील प्लास्टिकवर नियंत्रण ठेवण्याचे काम या समितींचे असून भीमाशंकर मंदिर आणि सर्व गावठाणे या भागातील प्लास्टिक वापरावर बंधन आणण्याचे अधिकार वनखात्याला नाहीत, तर निगडाळे-कोंढवळ ग्रामपरिस्थितीकी समितीचे कर्मचारी इतक्या मोठय़ा पर्यटकांना नियंत्रित करण्याबद्दल पुरेसे नसल्याचे समितीचे अध्यक्ष सांगतात.
धार्मिक पर्यटकांच्या लोंढय़ाने भीमाशंकर अभयारण्याच्या वाताहतीचा सविस्तर रिपोर्ताज ‘लोकप्रभा’मध्ये वाचा –
‘भीमाशंकरच्या मस्तकी कचऱ्याची गंगा’