भिवंडी-वाडा-मनोर या राज्य महामार्गावर पाली गावाजवळ असलेल्या निकृष्ट रस्त्यावरील खड्डय़ात बोलेरो जीपचे चाक अडकून झालेल्या अपघातात जीपमध्ये बसलेल्या दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, यामुळे संतापलेल्या या भागातील नागरिकांनी टोल वसूल करणाऱ्या कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी रस्ता रोको करत या महामार्गावरील वाहतूक तब्बल सहा तास रोखून धरली.
‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ या तत्त्वावर चौपदरीकरण करणाऱ्या सुप्रीम कंपनीने येथे निकृष्ट दर्जाचे काम केल्याने या भागात वारंवार अपघात होत आहेत, असा या भागातील ग्रामस्थांचा आरोप आहे. कंपनीला मात्र हा आरोप मान्य नाही. या वादाच्या पाश्र्वभूमीवर सोमवारी रात्री याच मार्गावर पाली गावाजवळ अपूर्ण असलेल्या रस्त्यामुळे नारायण पाटील यांची बोलेरो गाडी घसरून अपघात झाला. या अपघातामध्ये नारायण पाटील (३४) आणि त्यांची पत्नी नम्रता पाटील हे जागीच ठार झाले. त्यांचा मुलगा हिमांशू (९) या अपघातात गंभीर जखमी झाला.
भिवंडी-वाडा-मनोर या राज्य महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण अवस्थेत असतानाही या भागात दोन ठिकाणी टोलवसुलीस सुरुवात करण्यात आली आहे. अपूर्ण काम आणि टोलवसुली यामुळे ग्रामस्थ संतापलेले आहेत. याविरोधात यापूर्वी अनेक आंदोलनेदेखील झाली आहेत. शासकीय अधिकारी, पोलीस संबंधित टोलवसुली करणाऱ्या कंपनीला पाठीशी घालत असून त्यामुळेच रस्त्याच्या दुरवस्थेकडे कंपनीचे दुर्लक्ष सुरू आहे, असा आंदोलकांचा आरोप आहे. याच ठिकाणी गेल्या दोन वर्षांत सात अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला आहे. वारंवार तक्रारी करून टोलवसुली करणारी कंपनी साधी दखलदेखील घेत नाही, असा संताप व्यक्त करत पाटील दाम्पत्याच्या अंत्यविधीसाठी जमलेले ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. खासदार बळीराम जाधव यांच्या नेतृत्वाखाली या दाम्पत्याच्या घरासमोर हा रस्ता रोको करण्यात आला.
अप्पर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आंदोलनस्थळी येऊन टोल कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले.