लोकसत्ता आणि रिचा रिअल्टर्सची प्रस्तुती असलेल्या ‘हृदयेश फेस्टिवल’च्या रविवारच्या दुसऱ्या दिवशीही अनेक नामांकित कलाकारांनी आपल्या कलेचा आविष्कार रसिकांना घडवला, मात्र या दिवसाचे प्रमुख आकर्षण ठरले ते पं. बिरजू महाराज यांचे कथ्थक नृत्य. नृत्याच्या देहबोलीतून त्यांनी साकारलेल्या घटना, प्रसंग, संवाद यामुळे रसिकजन अक्षरश: थक्क झाले.
विलेपार्ले येथील साठय़े महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दोन सत्रांत हा कार्यक्रम झाला. त्याची सुरुवात प्रभात मैफलीने झाली आणि त्यात रंग भरले ते जगविख्यात सरोदवादक पं. अमजद अली खान यांनी! आपल्या मैफलीची सुरुवात करताना त्यांनी अहिर भैरव हा पहाटराग निवडला. हवेतील गारवा अनुभवणाऱ्या रसिकांना या रागाच्या घनगंभीर सुरांची ऊब मिळाली. यानंतर त्यांनी तोडी हा राग सादर करून या भारलेल्या वातावरणावर कळस चढविला. तब्बल दोन तास म्हणजे सकाळी आठ वाजेपर्यंत ही मैफल रंगली.
संध्याकाळच्या सत्राची सुरुवातही वाद्यसंगीताने झाली. उस्ताद शाहीद परवेज यांनी पं. रविशंकर यांना श्रद्धांजली अर्पण करून आपल्या सतारवादनास सुरुवात केली. प्रथम चारुकेशी आणि नंतर खमाज हे राग वाजवून रसिकांची मने जिंकली. काहीशा अपारंपरिक पद्धतीने खमाज सादर करून त्यांनी रसिकांची दाद मिळवली. शाहीद परवेज यांना योगेश सम्सी यांनी तबल्यावर उत्तम साथ केली. यानंतर ज्येष्ठ शास्त्रीय गायिका परवीन सुलताना यांनी व्यासपीठाचा ताबा घेतला.
गळ्यावर अनेक घराण्यांचे संस्कार होऊनही स्वतंत्र गायनशैली जोपासणाऱ्या या गायिकेने प्रथम ख्याल ही आपली खासियत सादर केली. रागेश्वरी या रागातील दोन ख्याल सलग सादर करून त्यांनी आपले प्रभुत्व दाखवून दिले. दीड तास चाललेल्या आपल्या मैफलीचा समारोप त्यांनी एका भजनाने केला.
मध्यंतरानंतरच्या सत्रात ज्यांची प्रतीक्षा होती ते पं. बिरजू महाराज रंगमंचावर आले आणि प्रेक्षागारात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. कृष्णस्तुती करणाऱ्या ‘शीर्ष मकुट’ या भजनाद्वारे त्यांनी नृत्यास सुरुवात केली. एकाच वेळी हे भजन गाऊन व त्यावर पदन्यास करून त्यांनी उपस्थितांना अचंबित केले. विलंबित, द्रुत, तीन लाख अशा विविध तबलावादनाच्या साथीने त्यांचे नृत्य रंगत गेले. सरदारजी आणि जपानी माणूस यांच्यातील संवाद, दोन महिलांमधील नोकझोंक आदी काल्पनिक प्रसंग तिहाईच्या माध्यमातून उलगडून दाखवून अनोखी कला सिद्ध केली. पंडितजींच्या नृत्याचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ‘परन’, या प्रकारात त्यांनी टेलिफोनची िरग, घोडय़ाची व गाईची जाड-पातळ शेपटी यांचा परस्परांशी संवाद, पदन्यास व अभिनयाद्वारे निर्माण केला, तेव्हा रसिकजन अक्षरश: थक्क झाले. शाश्वती सेन या शिष्येनेही त्यांना चांगली साथ दिली. या दोघांना पं. मुकुंदराज देव यांनी तबल्यावर अनुरूप साथ केली. येत्या ४ फेब्रुवारीला वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करणाऱ्या बिरजू महाराज यांचा हृदयेश आर्टस्चे अविनाश प्रभावळकर यांनी विशेष सत्कार केला.

वारसा सुरू राहण्यासाठी..
हृदयेश फेस्टिवलमध्ये भविष्यात गुणी-तरुण कलाकारांनी रंगमंच गाजवावा, यासाठी पूर्वतयारी म्हणून गानप्रभा महोत्सव आयोजित करण्यात येतो. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या या गानप्रभा महोत्सवात पं. रघुनंदन पणशीकर (गायन), पं. रूपक कुलकर्णी (बासरी), धनंजय हेगडे (गायन) आणि स्वीकार कट्टी (सतार) हे कलाकार सहभागी झाले होते. त्या वेळी झालेल्या सादरीकरणाच्या चार सीडींचा एक संच ‘रिचा रिअल्टर्स’ने प्रस्तुत केला असून बिरजू महाराज यांच्या हस्ते रविवारी त्याचे लोकार्पण करण्यात आले. विशेष म्हणजे या महोत्सवास उपस्थित असलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला ‘रिचा रिअल्टर्सच्या’ सौजन्याने या अल्बमचे विनामूल्य वितरण करण्यात आले.