महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती
केंद्र सरकारी भूखंडांवरील झोपडपट्टीवासीयांना पुनवर्सनाचे गाजर दाखवून आणि पात्रतेची मुदत वर्षभराने वाढवून ती ३१ डिसेंबर २००० करण्यासाठी भाजपने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर जिंकण्यासाठी ही रणनीती आखली जात असल्याचे मानले जात आहे. शिवसेनेशी युती न करता स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी भाजपने व्यूहरचना सुरू केली आहे, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. केंद्र सरकारच्या भूखंडांवर सुमारे अडीच ते तीन लाख झोपडय़ा असल्याचे भाजपचे शहर अध्यक्ष आशीष शेलार यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
शिवसेनेशी नंतर युती करावी लागली असली तरी विधानसभा आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक भाजपने स्वबळावर लढविली होती. त्याप्रमाणे मुंबईतही स्वबळावर निवडणूक लढविण्याचे भाजपचे मनसुबे आहेत. त्यासाठी झोपडपट्टीवासीयांना भाजपकडे वळविण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे पुनर्वसन करून त्याच जागी किंवा नजीकच्या परिसरात घर मिळणार, असे गाजर दाखविल्यास त्याचा चांगला राजकीय फायदा भाजपला निवडणुकांमध्ये होईल, असे पक्षनेत्यांचे मत आहे.

’केंद्रीय भूखंडांवर अनेक वष्रे झोपडय़ा असल्याने त्या जागांचा त्यांना फारसा उपयोगही नाही.
’त्यामुळे तेथे झोपु योजना राबविल्यास घरबांधणीला चालना मिळून परवडणारी घरे व सर्वासाठी घर या उद्दिष्टांना मदत होईल.
’त्याचबरोबर झोपडपट्टीवासीयांना खूष केल्यावर शिवसेना व काँग्रेसला टक्कर देता येईल आणि त्याचा भाजपला निवडणुकीत लाभ होईल.

अपात्रांनाही घर मिळावे
शहरातील केंद्राच्या भूखंडांवरील झोपडय़ांचे प्रमाण सुमारे २५ टक्के आहे. पोर्ट ट्रस्टच्या जागेवर दीड लाख, रेल्वेच्या जमिनीवर ३० हजार, संरक्षण विभाग भूखंडांवर सुमारे ३० हजार झोपडय़ा आहेत. सर्वासाठी घर योजनेनुसार विमानतळाच्या जागेतील अपात्र झोपडपट्टीवासीयांनाही घर मिळाले पाहिजे, अशी भूमिका शेलार यांनी घेतली आहे.