शिवसेना आमदारांची आज बैठक; भाजप राज्यपालांची भेट घेणार

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन आठवडे सुरू असलेला सत्तासंघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. भाजप नेते गुरुवारी राज्यपालांची भेट घेणार असून, शिवसेनेनेही आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. यामुळे सत्ता स्थापनेच्या दृष्टीने आज वेगवान घडामोडींचे संकेत आहेत.

सत्ता स्थापण्याबाबतची प्रक्रिया ७ नोव्हेंबरपासून सुरू करू, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपच्या मित्रपक्षांच्या नेत्यांशी बोलताना सूचित केले होते. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय परिस्थिती आणि सुरू असलेल्या घडामोडींची माहिती देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे शिष्टमंडळ गुरुवारी राज्यपालांची भेट घेणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाच्या गाभा समितीच्या बैठकीनंतर सांगितले. महायुतीच्या वतीनेच सत्ता स्थापण्याचा दावा केला जाईल, असे भाजपकडून वारंवार सांगण्यात येत असले तरी शिवसेनेकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास भाजप अल्पमतातील सरकार स्थापण्याचा दावा करू शकते. आतापर्यंत शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. आता भाजपही राज्यपालांकडे आपली बाजू मांडणार आहे.

दुसरीकडे, शिवसेनेने आमदारांची तातडीची बैठक गुरुवारी बोलावली असून, त्यात राजकीय परिस्थितीबाबत चर्चा होईल. सत्ता स्थापण्याबाबत शिवसेना कोणती भूमिका घेते, यावर पुढील राजकीय समीकरणे अवलंबून आहेत. मात्र, शिवसेना आणि भाजप यांच्यात जुळवाजुळवीचे प्रयत्न सुरूच आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा आणि शेतकऱ्यांच्या मदतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पालकमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेनेचे सर्व मंत्री उपस्थित होते. ही बैठक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर होती. तसेच शिवसेनेचे मंत्री अनुपस्थित राहिले असते तर शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही, असा आरोप झाला असता. यामुळेच शिवसेनेचे मंत्री बैठकीस उपस्थित राहिल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले.

भाजपची तयारी

भाजपने सरकार स्थापण्याची सारी तयारी केली आहे. शिवसेनेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर २०१४ प्रमाणेच अल्पमतातील सरकार स्थापण्याची भाजपची योजना आहे. शिवसेना आता सरकारमध्ये सहभागी झाली नाही तरी पुढील १५ दिवसांनंतर सरकारमध्ये सहभागी होईल, असा भाजप नेत्यांचा होरा आहे. पुढील दोन-तीन दिवसांत सरकार स्थापण्याची योजना असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

आम्ही विरोधी बाकांवर : पवार

राष्ट्रवादी आणि काँग्रेसला विरोधात बसण्याचा कौल जनतेने दिला आहे. सत्तास्थापनेसाठी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही, असा पुनरुच्चार राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केला. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांचे सरकार स्थापन होण्याची शक्यताही पवारांनी फेटाळली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे मत काँग्रेसच्या एका गटाचे असले तरी शिवसेनेशी हातमिळवणी करणे काँग्रेसला राजकीयदृष्टय़ा सोयीचे ठरणार नसल्याने पक्षाध्यक्षा सोनिया गांधीही याबाबत अनुकूल नसल्याचे मानले जाते.

मुनगंटीवारच गोड बातमी देतील : राऊत

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी बुधवारी केला. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविल्याशिवाय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वस्थ बसणार नाहीत, असे राऊत यांनी सांगितले. ‘सत्ता स्थापण्याबाबत लवकरच गोड बातमी मिळेल, असे सुधीर मुनगंटीवार सांगत आहेत. मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, ही गोड बातमी मुनगंटीवारच माध्यमांना देतील’, असे राऊत म्हणाले.