उमाकांत देशपांडे

भाजपच्या महाराष्ट्रातील माहिती-तंत्रज्ञान विभागाने (आयटी सेल) राज्यातील दीड-दोन कोटी मतदारांना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून जोडण्याची मोहीम सुरू केली आहे. पुढील दोन-तीन आठवडय़ांत राज्यभरात ९८ हजार व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप कार्यरत होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबरोबरच भविष्यात विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठीही मतदारांशी संपर्क ठेवण्यासाठी याचा वापर होणार आहे.

भाजपच्या नवनियुक्त राज्य पदाधिकाऱ्यांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आयटी सेलच्या कामाची गती वाढविण्याची सूचना केली होती. सध्या ६७ हजार समूह कार्यरत असले तरी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप कार्यान्वित करण्याचे सध्याचे काम अपेक्षेपेक्षा कमी असून ते वाढवावे, असे त्यांनी म्हटले होते.

या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपविषयी आयटी विभागाचे संयोजक प्रवीण अलई ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले, करोना काळात लोकांपर्यंत थेट संपर्क साधणे, सभा-मेळावे, बैठका घेणे शक्य नाही. पुढील काळातही मोबाइल व अन्य माध्यमांतून दृक्श्राव्य पद्धतीने संपर्क अधिक ठेवावा लागणार आहे. प्रत्येक गावात पोचण्यासाठी या माध्यमाचा वापर करण्याचे ठरविण्यात आले असून आतापर्यंत ६७ हजार ग्रुप्स कार्यान्वित झाले आहेत. प्रत्येक ग्रुपमध्ये किमान २०० सदस्य असावेत, अशा पद्धतीने  काम सुरू करण्यात आले आहे.

राज्यभरात प्रत्येक मतदान केंद्रनिहाय व मतदार यादीनुसार भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने मतदारांना जोडण्यात येत आहे. आयटी सेलचे सुमारे २५० कार्यकर्ते ही मोहीम पार पाडत आहेत. प्रत्येक बूथ, तालुका, जिल्हा पातळीवरील काही कार्यकर्ते या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये असतील. किमान एक कोटी मतदार पुढील दोन-तीन आठवडय़ांत जोडण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

केंद्र सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय, घडामोडी सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठीही या यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे. अत्याधुनिक राफेल विमाने हवाई दलात दाखल झाली, ही माहितीही या ग्रुपवर दिली गेली.

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महापालिका आणि विधानसभा-लोकसभा निवडणुकांमध्येही या ग्रुप्सचा प्रभावी वापर करण्याचे नियोजन आहे.

-चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष