लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी
वसई- वेबसीरिजमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीचे अश्लील चित्रीकरण करून तिला ब्लॅकमेल करणा-या पाच जणांविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्लील चित्रीकरण बेवसिरीज मधून हटविण्यासाठी आरोपींनी तिच्याकडून दोन लाखांची खंडणी मागितली होती.

२० वर्षीय पिडीत अभिनेत्री अंधेरी येथे राहणारी असून हिंदी शॉर्टफिल्म मध्ये काम करते. मार्च महिन्यात तिला एका वेबसीरिजमध्ये भूमिका मिळाली होती. त्यासाठी ६ मार्च रोजी तिला विरार येथील बलंग फार्म हाऊस मध्ये चित्रिकरणासाठी बोलविण्यात आले. तिथे चित्रिकरणाच्या नावाखाली अश्लील चित्रीकरण करण्यात आले. ही दृष्ये वेबसीरिज मध्ये समाविष्ट केली जाणार नाहीत असं तिला सांगण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात तिची फसवणूक करुन तिची ही अश्लील दृश्यं वेबसीरिजमध्ये टाकण्यात आली. हे समजताच तिने वेबसीरिजचे निर्माते आणि दिग्दर्शकांना जाब विचारला. त्यावेळी ही दृश्ये वगळण्यासाठी तिच्याकडून वेबसीरिजचे निर्मात्याने दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या अभिनेत्रीने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ही घटना विरार येथे घडली असल्याने हा गुन्हा विरार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

विरार पोलिसांनी याप्रकऱणी शावेश खान, रेहान खान, अशोक मेहता, पप्पू पांडे आणि अऩ्य एक आरोपी अशा पाच जणांविरोधात भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३८४, ५०९, ३४ सह माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आमच्याकडे रात्री उशीरा गुन्हा वर्ग होऊन आला आहे. याप्रकरणी आम्ही तपास करत असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.