मुंबई : मुंबई पालिकेने आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी तब्बल २० कोटी रुपये खर्च करून ७५ लाख मुखपट्टय़ा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनामुळे तूर्तास शाळा बंद आहेत. मात्र भविष्यात शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी मुखपट्टय़ा खरेदी केल्या जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, प्रशासनाने दोन वर्षांसाठी मुखपट्टय़ा खरेदीचा घाट घातल्याने नगरसेवकांकडून टीका होऊ लागली आहे.

शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सुरक्षिततेची बाब म्हणून मुखपट्टीचा वापर, सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन आणि सॅनिटायझरचा वापर करावा लागणार आहे. ही बाब लक्षात घेत प्रशासनाने पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी तब्बल ७५ लाख मुखपट्टय़ा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांला २५ मुखपट्टय़ा देण्यात येणार आहेत. पुढील दोन वर्षांसाठी मुखपट्टय़ा खरेदी करण्यात येणार आहेत.

एक मुखपट्टी धुऊन ३० दिवस वापरता येऊ शकते. त्यामुळे एका शैक्षणिक वर्षांसाठी एका विद्यार्थ्यांला १० मुखपट्टय़ांची गरज आहे. असे असतानाही २५ मुखपट्टय़ा देण्यात येणार आहेत. यावरून नगरसेवकांनी प्रशासनावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. सध्या निर्माण झालेल्या अर्थसंकटात गरजेपुरत्या मुखपट्टय़ा खरेदी करण्याऐवजी त्या दामदुप्पट संख्येने घेण्यात येत आहेत. तूर्तास एका वर्षांसाठी त्या खरेदी कराव्या. पुढच्या वर्षी गरजेनुसार खरेदी करावी, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे.

कंत्राटदाराच्या फायद्यासाठी?

नगरसेवक निधीतून नागरिकांसाठी मुखपट्टय़ांची खरेदी करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून होत होती. मात्र त्यास प्रशासनाने परवानगी नाकारली. आता प्रशासनच विद्यार्थ्यांच्या नावाखाली दोन वर्षांसाठी मुखपट्टय़ा खरेदीचा घाट घालत आहे. मुखपट्टय़ा विद्यार्थ्यांसाठी खरेदी करण्यात येत आहेत की कंत्राटदाराच्या फायद्यासाठी, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.