मुंबई : मुंबईमधील मनुष्यवस्तीमध्ये सर्पाचा वावर वाढत असल्याचे निदर्शनास आले असून काही नागरिक सर्प दिसताच घाबरून त्याला ठार मारतात. ही बाब लक्षात घेऊन मनुष्यवस्तीत सापडणारे सर्प वा सरपटणारे प्राणी प्राणिसंग्रहालयामध्ये सोडण्याचे आवाहन पालिकेने करावे, अशी मागणी जोर धरत होती. मात्र पालिका प्रशासनाने त्यास स्पष्ट नकार दिला आहे. असे सर्प भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात ठेवता येणार नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

मुंबईमधील काही वस्त्यांमध्ये अधूनमधून सर्पाचा संचार असतो. साप दिसताच वस्तीतील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरते. काही वेळा नागरिक सापाला ठार मारतात. परिणामी, सापांच्या काही दुर्मीळ जाती नष्ट होत आहेत. परिणामी मनुष्यवस्तीत सापडणारे साप सर्पमित्रांच्या मदतीने पकडून प्राणिसंग्रहालयात सोडण्यात यावे, असे आवाहन पालिकेने नागरिकांना करावे. तसेच मुंबईतील सर्पमित्रांची नावे, संस्था, संपर्क क्रमांक याची एकत्रित माहिती पालिकेच्या विभाग कार्यालयांत दर्शनी भागात प्रदर्शित करावी, तसेच ती पालिकेच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करावी, यासाठी एक समिती स्थापन करावी, अशी मागणी नगरसेविका वैशाली शेवाळे यांनी १४ डिसेंबर २०१८ रोजी पालिका सभागृहात मांडली होती. सभागृहाने मंजुरी दिल्यानंतर ती आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आली होती. आयुक्तांनी त्यावरील आपला अभिप्राय सादर केला आहे.

‘समिती स्थापन करण्याची आवश्यकता नाही’

नवी दिल्ली येथील केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मान्यताप्राप्त प्राणिसंग्रहालयांमध्ये मर्यादित स्वरूपात ठरावीक प्रजातींचे काही वन्य प्राणी, पक्षी प्रदर्शित करण्यात येतात. त्यानुसार भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय हे मध्यम प्राणिसंग्रहालय म्हणून मान्यताप्राप्त आहे. तेथे विविध प्रजातींचे वन्य प्राणी, पक्षी प्रदर्शित करण्यात आले आहे. प्राणिसंग्रहालय वगळता मुंबईतील विविध भागांमधील सर्व प्राणी-पक्षी यांचे संवर्धन, देखभालीसाठी शासनाच्या वन खात्यामार्फत विविध प्राणी बचाव केंद्र, पशुसंवर्धनगृहे कार्यान्वित आहेत. शहरात साप आढळल्यास वन खात्याने नियुक्त केलेल्या सर्पमित्रांच्या मदतीने पकडून ते जंगलात सोडण्यात येतात. त्यामुळे यासाठी समिती स्थापन करण्याची आवश्यकता नाही, असे प्रशासनाने अभिप्रायात स्पष्ट केले आहे.