घराघरांत तपासणी, संशयितांचा शोध, नियमांच्या अंमलबजावणीसाठी पथके सज्ज

मुंबई : अंधेरी पश्चिम आणि आसपासच्या परिसरातील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पालिकेने कंबर कसली असून घरोघरी रहिवाशांची तपासणी, करोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींच्या शोधमोहिमेला गती देण्यात आली आहे. त्याचबरोबर टाळेबंद इमारती आणि प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये नियमांचे कडक पालन होते की नाही यावरही करडी नजर ठेवण्यासाठी पथके सज्ज करण्यात आली आहेत.

अंधेरी पश्चिम परिसरातील झोपडपट्टय़ांमध्ये मे-जूनच्या दरम्यान करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली होती. त्यामुळे पालिकेच्या ‘के-पश्चिम’ विभाग कार्यालयाने झोपडपट्टय़ांत केलेल्या उपाययोजनांमुळे जुलैमध्ये रुग्णवाढीचा वेग मंदावला. मात्र टाळेबंदी शिथिल केल्यानंतर उच्चभ्रू वस्त्या आणि अन्य इमारतींमध्ये मोठय़ा संख्येने रुग्ण आढळू लागले आहेत. नागरिकांकडून पाळण्यात येत नसलेली शिस्त रुग्णवाढीचे कारण बनली आहे. रुग्णवाढ नियंत्रणात आणण्यासाठी ‘के-पश्चिम’ विभागाने घरोघरी जाऊन रहिवाशांच्या तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. त्याचसोबत करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. करोनाबाधितांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या गटातील व्यक्तींनाही करोनाची बाधा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संशयित रुग्णांमधील अतिजोखमीच्या गटातील व्यक्तींना करोनाची बाधा होऊ नये म्हणून विलगीकरणात ठेवण्यात येत आहे.

झोपडपट्टय़ांकडेही लक्ष

उच्चभ्रू वस्त्यांमध्ये उपाययोजना करताना झोपडपट्टय़ांकडे दुर्लक्ष होऊ नये याचीही काळजी घेण्यात येत आहे. झोपडपट्टय़ांमधील बाधितांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या व्यक्तींना विलगीकरणात हलविण्यात येत आहे. करोनाबाधितांचे घर आणि परिसर निर्जंतुक करण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्रे आणि टाळेबंद केलेल्या इमारतींवर करडी नजर ठेवण्यासाठी पथके सज्ज करण्यात आली आहेत. या परिसरातील करोना काळजी केंद्रे प्राणवायूच्या सुविधेसह सज्ज ठेवण्यात आली आहेत. रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर सहा रुग्णालयांमधील काही खाटाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती ‘के-पश्चिम’ विभागाचे साहाय्यक आयुक्तविश्वास मोटे यांनी दिली.