मात्र मृत्यू दर ६.२६ टक्क्यांवर; सामाजिक संस्थांची मदत, घरोघरी तपासणी आणि गल्ली शिबिरांमुळे यश

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : घरोघरी केली जाणारी तपासणी, शिबीर, सामाजिक संस्थांचा पुढाकार, विलगीकरणासाठी केलेल्या उपाययोजना यांमुळे ईशान्य मुंबईतील कांजूर, विक्रोळी, भांडुप, नाहूर, पवई या ६.२६ मृत्यूदर असलेल्या परिसरातील करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात हळूहळू पालिकेला यश येऊ लागले आहे. या प्रयत्नांमुळे भागातील ८३.११ टक्के  रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

‘एस’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या कांजूर, विक्रोळी, भांडुप, नाहूर, पवईत मार्चमध्ये पहिला रुग्ण सापडला. एप्रिलमध्ये १४१ जणांना करोनाची बाधा झाल्याचे चाचणीअंती स्पष्ट झाले. तर मेमध्ये १,४१७, जूनमध्ये २,८९० जण बाधित झाले. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन ‘एस’ विभागाने तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली. सामाजिक संस्थांच्या मदतीने सव्वासहा लाख लोकसंख्या असलेल्या भागात २०९ तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये १५,८६३ जणांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान २८५ करोना संशयित सापडले. आवश्यकतेनुसार १६२ जणांची चाचणी करण्यात आली असून त्यापैकी ५७ जणांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.

पालिकेच्या वैद्यकीय पथकांनी येथील तब्बल घरांना भेटी देऊन ८,६२,२६४ जणांची तपासणी केली. या भागात १,५०७ व्यक्तींच्या प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी ५४ जण करोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर ३०,९८३ लोकसंख्या असलेल्या भागात २७ गल्ली शिबिरांचे आयोजन करण्यात आले.  या उपाययोजनांनंतर जुलैमध्ये १,९५५ जणांना बाधा झाल्याचे समोर आले. रुग्णांच्या संपर्कातील संशयितांची विलगीकरणात रवानगी केल्यानंतर हळूहळू या भागातील करोना रुग्णांची संख्या घसरू लागली आहे. ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसांत ४१६ जणांना करोनाची बाधा झाली आहे. या भागात नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास मोहकर यांनी दिली.

मार्चपासून आतापर्यंत या भागात ६,७८० जणांना करोनाची बाधा झाली असून सक्रिय रुग्णांचे प्रमाण आज १०.६१ टक्के  आहे. आजघडीला या भागात ७२० सक्रिय रुग्ण आहेत. सुमारे ५,६३५ जण करोनामुक्तझाले असून करोनामुक्त झालेल्या रुग्णांचे प्रमाण ८३.११ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर ४२५ जणांचा मृत्यू झाला. या परिसरातील साधारण ६१ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण ५७.८८ टक्के  इतके आहे.

ईशान्य मुंबईतील करोनास्थिती

                              संख्या         टक्के वारी

एकूण बाधित           ६,७८०

करोनामुक्त            ५,६३५               ८३.११

सक्रिय रुग्ण            ७२०                 १०.६१

मृत्यू                       ४२५                    ६.२६

वयोगटानुसार मृत्यूची टक्के वारी

वयोगट          टक्के वारी

१५ ते ४०               ८.७०

४१ ते ५०               १३.४१

५१ ते ६०               २०.००

६१ आणि वरील    ५७.८८

आता या भागात नवे करोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सामाजिक संस्था, डॉक्टर, नगरसेवकांच्या सहभागातून केलेल्या उपाययोजनांना यश येत आहे.

– संतोषकुमार धोंडे, सहाय्यक आयुक्त, ‘एस’ विभाग