झोपडपट्टीवासियांना पर्यायी जागा देण्याबाबत खुलासा नसल्याने स्थायी समितीचा निर्णय

मुंबई : भांडुप येथील दाट लोकवस्तीच्या भागात पाच कोटी रुपयांचा खर्च करून जपानी पद्धतीने उद्यान तयार करण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र येथील जमिनीवर झोपडय़ांचे अतिक्रमण असून त्यांना पर्यायी घरे देण्याबाबत प्रशासनाकडून योग्य खुलासा होऊ न शकल्याने या संबंधीचा प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत मागे ठेवण्यात आला.

Loksatta vyaktivedh Vitthal Shanbhag Ranichi Bagh at Byculla Mumbai Jijamata Park
व्यक्तिवेध: विठ्ठल शानभाग
Tiger from sanctuary missing after collar falls off Nagpur
‘कॉलर’ गळून पडल्याने अभयारण्यातील वाघीण ‘बेपत्ता’
dombivli ganesh nagar marathi news, dombivli concrete road broken marathi news
डोंबिवली: पंधरा दिवसांपूर्वी तयार केलेल्या गणेशनगर मधील काँक्रीट रस्त्याची तोडफोड, नागरिकांमध्ये तीव्र संताप
Dhokli village, Illegal building Dhokli village,
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई

डोंगराळ आणि दाट वस्तीने गजबजलेल्या भांडुपमध्ये फारशी उद्याने नाहीत. विकास आराखडय़ात मोकळ्या जागांसाठी आरक्षित ठेवलेल्या जागांवर उद्याने विकसित करण्याचे पालिकेने ठरवले आहे. त्यानुसार सीटीएस क्रमांक १९८ या भूखंडावर जपानी पद्धतीचे उद्यान केले जाईल. मात्र या जागेवर झोपडय़ा असून त्यांना पर्यायी घरे देण्याची काय व्यवस्था केली आहे आणि ही घरे तेथून हटवल्याशिवाय उद्यानाचा घाट का घातला जात आहे, असे प्रश्न भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केले. त्याचप्रमाणे या उद्यानाच्या विकासासाठी केवळ एकाच कंत्राटदाराने निविदा भरलेली असूनही पुन्हा निविदा न बोलावता कंत्राट का दिले जात आहे, असा मुद्दाही शिंदे यांनी उपस्थित केला. भूखंडावरील काही जागेत अतिक्रमण असले तरी उर्वरित भागाचा विकास सुरू केला जाईल.

दरम्यानच्या काळात अतिक्रमणे काढली जातील, असे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी सांगितले, मात्र सदस्यांचे समाधान न झाल्याने हा प्रस्ताव मागे ठेवण्यात आला.

या प्रस्तावानुसार हे उद्यान तयार करण्यासाठी ४ कोटी ९० लाख रुपये खर्च येणार असून त्यातील ३ कोटी ७३ लाख रुपये स्थापत्य कामांसाठी, ३८ लाख रुपये विद्युत व यांत्रिकी कामांसाठी तर ७९ लाख रुपये उद्यान कामांसाठी खर्च केले जातील. स्थापत्य कामांतर्गत संरक्षक भिंत बांधणे, अंतर्गत पायवाटा, गझेबो बांधणी, भूमिगत पाण्याची टाकी, सुरक्षारक्षक चौकी, प्रवेशद्वाराची कामे, उद्यानासाठी मातीची भरणी, वरिष्ठ नागरिकांसाठी बैठकव्यवस्था केली जाईल. विद्युत व यांत्रिकीअंतर्गत विद्युत दिवे, मुलांकरीचा खेळणी, सीसीटीव्ही कॅमेरा लावले जातील.

जपानला जाऊन आले म्हणून..

जपानी पद्धतीचे उद्यान म्हणजे नेमके काय केले जाणार आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा गोंधळून गेलेल्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्याने ‘उद्यान विभागाचे उपायुक्त जपानला जाऊन आले आहेत,’ असे सांगितले आणि बैठकीत खसखस पिकली. जपानी पद्धतीची बैठकव्यवस्था, पायवाटा आणि हिरवळ या उद्यानात असेल.