मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी वांद्रे- कुर्ला संकुलातील(बीकेसी) जागा देण्याबाबत केंद्राच्या हस्तक्षेपानंतर राज्य सरकारने काहीशी नमती भूमिका घेतली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने प्रस्तावित जागतिक वित्तीय सेवा केंद्राची ही जागा बुलेट ट्रेनसाठी देण्यास विरोध दर्शविला होता. मात्र बुलेट ट्रेनसाठी फारच थोडी जागा तीही जमिनीच्या खाली लागणार असल्याने त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्यास रेल्वेला सांगण्यात आले आहे. त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
बुलेट ट्रेनसाठी बीकेसीतील जागेची मागणी रेल्वेने केली आहे. मात्र ही जागा मोक्याची असल्याने ती देण्यास एमएमआरडीएने सुरुवातीपासूनच विरोध दर्शविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रारंभी ही जागा देण्यास विरोध दर्शविला होता. त्यानंतर कुर्ला कारशेडच्या जागेत बुलेट ट्रेन उभारण्याची चाचपणी रेल्वेने सुरू केली होती. मात्र आता बीकेसीमध्येच स्थानक उभारण्यासाठी रेल्वे आग्रही असून जमिनीच्या दोन स्तर खाली काही प्रमाणात जागा लागणार असून त्याच्या खाली बुलेट ट्रेन थांबतील. शिवाय खाली स्थानक झाले तरी वरती इमारत बांधण्यास कोणतीही अडचण येणार नाही अशी रेल्वेची भूमिका आहे. त्याबाबत सविस्तर अहवाल देण्यास रेल्वेला सांगण्यात आले आहे. त्यांच्या अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय होईल, असे सांगत बुलेट ट्रेन बीकेसीतूनच सुटण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.