मुंबई महानगरपालिका शाळेत

मुंबई : कचरा वर्गीकरण आणि त्याचा पुनर्वापर करण्याचे संस्कार भावी पिढीवर लहान वयातच व्हावेत यादृष्टीने सध्या पावले उचलली जात आहेत. दूध, ओआरएस, सरबत इत्यादी बाजारात मिळणाऱ्या पाकीटबंद पेयांची वेष्टने म्हणजेच कार्टन पॅकेजेसपासून तयार केलेले बाक माहीमच्या ‘सिटी ऑफ लॉस एन्जेलिस’ पालिका शाळेत बसवले जाणार आहेत. यासाठी ५ लाख कार्टन पॅकेजेसचा वापर होणार आहे.

दरवर्षी मुंबईत लाखो टन कचरा निर्माण होतो. या कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे कचऱ्याचे वर्गीकरण आणि त्याचा पुनर्वापर करण्यासंबंधीच्या सूचना पालिका आणि स्वयंसेवी संस्थांतर्फे  वारंवार दिल्या जातात. जास्तीत जास्त कचऱ्याचा पुनर्वापर करून कचऱ्याचे प्रमाण कमी करण्याची आवश्यकता आहे. यासाठी विविध संस्थांतर्फे  अनेक उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून ‘टेट्रा पॅक’ या अन्न प्रक्रिया आणि वेष्टननिर्मिती (पॅके जिंग) कंपनीने २०१० साली ‘गो ग्रीन विथ टेट्रा पॅक’ हे अभियान सुरू केले. याअंतर्गत वापरून झालेले कार्टन पॅकेजेस २०० केंद्रांवर संकलित केले जातात. त्यावर पालघर येथे प्रक्रिया करून त्यापासून फळ्या (पॅनेल बोर्ड्स) तयार केल्या जातात.

कार्टन पॅकेजेसपासून तयार केलेल्या फळ्यांचा वापर उद्यानातील अथवा शाळांमधील वर्गातील बाक आणि इतर उपयुक्त वस्तू तयार करण्यासाठी केला जातो. एक बाक तयार करण्यासाठी ११ हजार कार्टन पॅकेजेसची गरज असते. अशाप्रकारे आतापर्यंत मुंबईत ३०० बाक बसवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आता ‘सिटी ऑफ लॉस एन्जेलिस’ शाळेलाही बाक पुरवले जाणार आहेत.