तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबई पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. यावर्षी प्रथमच लालबाग राजा विसर्जन मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात आहेत. तर मानवरहित विमान (ड्रोन) चा वापर केला जाणार आहे. या काळात सर्व पोलिसांच्या रजाही रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबई शहरात या वर्षी ६३४१ सार्वजनिक, तर १,२०,७५३ घरगुती गणपती आहेत. या काळात शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. या काळात पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून ३५ हजारांहून अधिक पोलीस रस्त्यावर बंदोबस्तासाठी उतरणार आहेत. विविध स्वयंसेवी संस्थांमधील १० हजार स्वयंसेवक पोलिसांच्या मदतीसाठी असणार आहेत. पोलिसांव्यतिरिक्त राज्य राखीव पोलीस बल, शीघ्र कृती दल, फोर्स वन, दहशतवाद विरोधी पथक, दंगल नियंत्रण पथक, बॉम्ब शोधक-नाशक पथक, दहशतवाद विरोधी कक्ष कार्यरत राहणार आहे. ड्रोनचाही वापर केला जाणार आहे.
सोशल मीडिया सेलही मेसेजेस आणि संकेतस्थळांवरील संदेशांवर लक्ष ठेवणार आहे. कुठल्याही दहशतवादी हल्ल्याची सूचना नसली, तरी हा कडक बंदोबस्त राहणार असल्याचे सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) देवेन भारती यांनी सांगितले. डीबी मार्ग, व्हीपी रोड पोलीस ठाणे, गिरगाव चौपाटीवरील नियंत्रण कक्षातून सीसीटीव्हीद्वारे त्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. वाहतूक व्यवस्थेतील बदलांची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे. ९७ रस्त्यांवर वाहनांना बंदी घातल्याची माहिती सहपोलीस आयुक्त (वाहतूक) मिलिंद भारांबे यांनी दिली.