भ्रष्टाचार करणे आणि तो पचवणे, एवढेच सत्ताधारी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काम उरले आहे. त्यामुळेच त्यांच्या मंत्र्यांची पोटं सुटली आहेत आणि आमच्या कामगारांची पोट सुकत चालली आहेत, या शब्दांत शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील आणि राज्यातील सरकारवर सोमवारी टीकास्त्र सोडले. 
महागाईविरोधात राज्यातील ३४ कामगार संघटनांनी मुंबईमध्ये सोमवारी लॉंग मार्च काढला होता. त्या मोर्चाचा समारोप आझाद मैदानावर सभेने झाला. या सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांवर शाब्दिक हल्ला चढविला.
ते म्हणाले, राज्यात मोठा दुष्काळ पडला आहे आणि राष्ट्रवादीचे मंत्री शाही थाटात लग्न करण्यात आणि सहस्रभोजनं घालण्यात दंग आहेत. हे सर्वजण खाऊन-पिऊन सुस्त झाले आहेत. शरद पवार यांच्या ‘झोपे’मुळेच मंत्री पैसा ओरबडत आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी कधीही शरद पवारांसारखा कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही.
एकजुटीचे महत्त्व काय असते, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे यापुढे युनियनच्या वेगवेगळ्या चुली बंद करून, एकच होळी पेटवा ज्यामध्ये सरकार भस्मसात होईल. ही एकजूट निवडणुकीपर्यंत दाखविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
देशभरातील कामगार संघटनांनी २० आणि २१ तारखेला पुकारलेल्या संपामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचे कोणतेही हाल होणार नाहीत, याची काळजी सर्वांनी घ्यावी, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.