लोकल म्हणजे मुंबईकरांची लाईफलाईन, पण याच लोकलमुळे दिवसागणिक अपघात होताना दिसतात. या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी मध्य रेल्वे सातत्याने काही ना काही प्रयत्न करताना दिसते. नुकताच मध्य रेल्वेने एक नवीन प्रयोग केला असून त्यामुळे लोकल सुरु होताना प्रवाशांना विशिष्ट सूचना मिळणार आहे. यासाठी रेल्वेला विशिष्ट प्रकारचे इंडिकेटर लावण्यात आले असून त्याव्दारे प्रवाशांना लोकल सुरु होणार असल्याचे सूचित केले जाणार आहे. रेल्वे सुरु झाल्यावर अनेक प्रवासी गाडी पकडण्याची धावपळ करतात. अशावेळी अपघात घडण्याची शक्यता जास्त असते. हे टाळण्यासाठी आता मध्य रेल्वेने आपल्या डब्यांना इंडिकेटर लावले आहेत. हे इंडिकेटर निळ्या रंगांचे असून गाडी सुटण्याच्या वेळी हा निळा लाईट ब्लिंक होणार आहे.

यामुळे शेवटच्या क्षणी लोकलमध्ये चढण्यामुळे होणाऱ्या अपघातांची संख्या घटण्याची शक्यता आहे. ही माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करत दिली आहे. यामध्ये त्यांनी हा निळ्या रंगाचा लाईट कशाप्रकारे असेल याचा एक व्हिडियोही अपलोड केला आहे. हे ट्विट आतापर्यंत ५३ हजारहून अधिक जणांनी पाहिले असून तुम्हालाही मध्य रेल्वेमधून प्रवास करताना अशाप्रकारचा लाईट दिसला तर तो गाडी सुरु झाल्याचा आहे हे लक्षात ठेवा. याआधी गाडी सुरु झाली की केवळ हॉर्न वाजत असेल पण आता त्यामध्ये या लाईटची भर पडणार आहे. आपल्या ट्विटमध्ये गोयल यांनी Safety First असेही म्हटले आहे. सेंट्रल रेल्वेने त्यांचे हे ट्विट रिट्विट केले आहे.