मुंबई-पुणे पूर्व द्रुतगती मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना आता विशेष सावधानता बाळगावी लागणार असून महिलावर्गाला खास काळजी घ्यावी लागणार आहे. या मार्गावर दुचाकीवरून येणारे चोरटे हे महिलांच्या गळ्यातील दागिने, सोनसाखळ्या तसेच प्रवाशांच्या हातातल्या बॅगा हिसकावत असून मुख्यत्वे सण अथवा साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी या घटना होताना दिसत आहेत. मार्गावरील बसथांबे, एकाकी परिसरात होणाऱ्या या घटना थांबविण्यासाठी पोलीस विविध क्लृप्त्या लढवत असले तरी या मार्गावरून नियमित प्रवास करणारा महिलावर्ग व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पूर्व द्रुतगती मार्ग हा ठाणे ते चेंबूर असा २३ किलोमीटर अंतराचा असून मुख्यत्वे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या या मार्गावरून दररोज ५० हजार वाहनांची वाहतूक सुरू असते. शहरी लोकसवस्तीपासून दूरवरून जाणाऱ्या या मार्गावर गेल्या दोन-तीन वर्षांपासून मात्र सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढीस लागले आहे. बसथांब्यांवर उभ्या असलेल्या महिला, तसेच दुचाकी, रिक्षा आदींतून प्रवास करणारे प्रवासी आदींचे दागिने, बॅगा दुचाकीवरून येणारे चोरटे हिसकावून नेत असल्याचे प्रकार घडत आहेत. ठाणे ते चेंबूपर्यंतच्या या पट्टय़ात हे चोरीचे प्रकार घडत असून हा पट्टा शहरी वस्तीपासून दूर व एकाकी असल्याने इथे चोरी करणे चोरटय़ांना सहज शक्य होत असल्याचे दिसून आले आहे. सण व साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी या मार्गावरून वाहनांची वाहतूक कमी होत असल्याने सुट्टीच्या दिवशी या चोऱ्या होत असल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे दागिन्यांची शिताफीने चोरी करून संबंधित व्यक्तीला कळण्याआधीच मोकळ्या मार्गावरून पळ काढण्यात या चोरटय़ांना यश येत आहे.

घटना
विक्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या या मार्गात याच महिन्यांत गोदरेज कॉलनी परिसरात दोन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या असून गेल्या सहा महिन्यांत या पोलीस ठाण्याच्या हद्दीत किमान दहा घटना घडल्या आहेत. तर येथून पुढे असलेल्या पंतनगर पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी आठ तर चालू वर्षी नुकतीच एक घटना घडली आहे. २०१४ साली या ठाण्याच्या हद्दीत अशा वीस घटना घडल्याचे या पोलीस ठाण्याच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, याबाबत विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर हंचाटे यांना विचारले असता ते म्हणाले की, सोनसाखळी चोर हे सुट्टीच्या दिवशी या चोऱ्या करत असून मार्ग शहरी वस्तीपासून दूर असल्याने व येथे सिग्नल्सची संख्या कमी असल्याने चोरांचे फावते आहे. मात्र, आम्ही गस्त वाढवली असून या चोरांना अटकाव करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर, या चोरीच्या घटनांवर मात करण्यासाठी पंतनगर पोलीस ठाण्याने उपाय म्हणून बसथांबे अथवा एकाकी परिसरात साध्या वेशातील महिला पोलिसांना उभे करून चोरीसाठी आलेल्या चोरटय़ांना पकडण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे, आमच्या हद्दीतील चोऱ्यांचे प्रमाण घटल्याचे पोलीस ठाण्याच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.