बर्फीवाला पुलाखालील गोखले चौकाची निवड

मुंबई : ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ आणि महापालिका मुख्यालय या दोन ऐतिहासिक इमारतींच्या परिसरातील चौकात पालिकेने पादचाऱ्यांच्या व वाहतुकीच्या सोयीसाठी केलेले बदल वादात सापडलेले असताना अंधेरीतील गोखले पुलाखाली असलेल्या चौकातही असेच बदल करण्याचे पालिकेने ठरवले आहे. सी. डी. बर्फीवाला पूल आणि गोखले पुलाखालील चौकाची त्याकरिता निवड करण्यात आली आहे.

‘ब्लूमबर्ग फिलॅन्ट्रॉफिज इनिशिएटिव्ह’ आणि महापालिकेच्या पुढाकाराने रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विविध सुधारणा राबवल्या जात आहेत. त्याअंतर्गत मुंबईतील अनेक ठिकाणी अशा उपाययोजना व सुधारणा करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत सर्वात प्रथम सीएसएमटीच्या चौकातील रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर पादचारीभिमुख बदल करण्यात आले आहेत. यात पादचाऱ्यांसाठी पिवळ्या रंगाचे पट्टे आखण्यात आले होते. मात्र महिन्याभराच्या आतच स्थानिक लोकांनी व वाहनचालकांनी तसेच नगरसेवकांनी विरोध केल्यामुळे हा बदल आता नावापुरताच उरला आहे. पायवाटांवरील पिवळ्या पट्टय़ांचा रंगही बदलला आहे. मात्र आता असाच बदल अंधेरीत करण्यात आला आहे.

अंधेरीतील सी. डी. बर्फीवाला पूल आणि त्याला जोडूनच रेल्वेवरील गोखले पूल आहे. या पुलाच्या खाली असलेल्या गोखले चौकात हे पादचाऱ्यांच्या सोयीचे बदल करण्यात येणार असल्याची माहिती अंधेरीतील के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली. गोखले चौक आणि स्वामी विवेकानंद मार्ग (एस. व्ही. रोड) यांना छेदणारा हा चौक अंधेरी पूर्व आणि पश्चिम यांना जोडतो. जवळजवळ ६ हजार चौ. मीटर क्षेत्रफळात हा चौक पसरलेला आहे. या चौकातून दर तासाला सुमारे आठ हजार वाहने जातात. या चौकात अपघात होण्याचा धोकाही अधिक आहे. त्यामुळे पालिकेच्या के पश्चिम विभागाने या चौकाची निवड केली आहे. या रस्त्यावर झेब्रा कॉसिंगचे पट्टे आखण्यात आले आहेत. तसेच पादचाऱ्यांसाठी पायवाटांचे आरेखन करण्यात आले आहे.

लवकरच या रस्त्यावर या पद्धतीने पट्टे आखण्यात येतील. या बदलांमुळे जवळच असलेल्या पालिकेच्या शाळांतील मुलांना खूप फायदा होणार आहे. ही मुले रोज हा चौक पार करून जात असतात.

या बदलांमुळे नक्की काय उपयोग होतो याबाबत पालिका स्थानिक नागरिकांकडून प्रतिक्रिया घेणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या पुलाखालील जागेवर गाडय़ा उभ्या करण्यात येत होत्या. मात्र या बदलामुळे हा भाग पादचाऱ्यांसाठी वापरात येणार आहे.