बंद करण्याचे आदेश कंपनीकडून धाब्यावर; स्थानिकांकडून आरोग्याच्या तक्रारी

स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याच्या कारणाखाली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने चेंबूरच्या गडकरी खाण येथील सिमेंट प्रकल्प बंद करण्याचे आदेश देऊन दोन महिने उलटल्यानंतरही हा प्रकल्प सुरूच आहे. या प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या धुळीमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.

चेंबूरच्या माहुल गाव आणि गडकरी खाण परिसरात अनेक तेल आणि वीज कंपन्या आहेत. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मोठय़ा प्रमाणात प्रदूषणाला सामोरे जावे लागते. असे असतानाच पाच वर्षांपूर्वी येथील प्रकाशनगर या रहिवासी वस्तीमध्ये एक सिमेंट निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला. अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाला स्थानिकांनी सुरुवातीपासूनच विरोध केला होता. परंतु, काही राजकीय नेत्यांच्या वरदहस्तामुळे या प्रकल्पावर कारवाई करण्यात आली नाही. या ठिकाणी दिवसरात्र सिमेंट रेडिमिक्सचे काम सुरू असते. त्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. या धुळीचा त्रास रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम करू लागला. या विभागातील रहिवाशांना सातत्याने अंगाला खाज येणे, सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या विकारांना तोंड द्यावे लागत आहे.

या संदर्भात रहिवाशांनी आंदोलने केल्यानंतरही प्रकल्पावर कारवाई करण्यात आली नाही. अखेर  रहिवाशांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबत तक्रार केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवीत दोन महिन्यांपूर्वी हा प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पालिकेनेही येथील नळजोडणी तोडली तसेच प्रकल्पाचा विद्युतपुरवठाही खंडित करण्यात आला. मात्र, त्यानंतरही गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकल्प सुरूच आहे. या ठिकाणी टँकरद्वारे पाणी आणून तसेच विद्युत जनित्राद्वारे वीज घेऊन काम सुरू आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकल्पाविरोधात तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगरसेविका निधी शिंदे यांनी केली आहे. दरम्यान, या संदर्भात प्रकल्पाची देखरेख करणारे ललित मेहता यांच्याशी संपर्क साधला असता, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचा दावा त्यांनी केला.