मालवणीच्या खारोडी गावात ज्या विषारी दारूमुळे शंभरहून अधिक जणांचे बळी गेले त्या दारूमध्ये घातक रसायन मिसळलेले होते. हे रसायन पुरविणाऱ्या मन्सूर खान ऊर्फ आतिकला गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली येथून मंगळवारी अटक केली. आतिकच्या अटकेमुळे या गुन्ह्य़ात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता ८ झाली आहे. गुरुवारी हे विषारीकांड उघडकीस आल्यानंतर आतिक कुटुंबीयांसमवेत दिल्लीत पळून गेला होता. गुन्हे शाखेचे पथक त्याच्या मागावर होते. तो दिल्लीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी दिल्लीत जाऊन त्याला अटक केली. त्याला बुधवारी मुंबईत आणले जाणार आहे. त्याच्या कार्यपद्धतीबाबत बोलताना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतिक गुजरातहून हे रसायन आणून सलीम लंगडा, ममता राठोड, फ्रान्सिस आदींना विकत होता. दारूचे प्रमाण वाढविण्यासाठी पाण्याबरोबर हे रसायन त्यात मिसळले जायचे. हे केमिकल मिथेनॉल असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आतिक गुजरातमधील एका व्यापाऱ्याकडून हे केमिकल आणत होता. गुन्हे शाखेने आरोपींकडून रसायनांची  ९ पिंपे जप्त केली. २५ हजार रुपयांना आतिकने ही रसायनाची भरलेली पिंपे आणली होती.
अशी व्हायची भेसळ
दहा लिटर गावठी दारूत भेसळ करून ते २५ लिटपर्यंत बनवले जायचे. त्यात मिथेनॉल रसायन टाकले जायचे. मिथेनॉल हे रंगहीन असल्याने सहज मिसळले जायचे. दहा रुपये प्रतिग्लास ही भेसळयुक्त दारू विकली जात होती.
दहिसर येथे गावठी दारू जप्त
मालवणी विषारीकांडानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली असून त्यांनीही छापे घालून कारवाई करायला सुरुवात केली आहे. बुधवारी विभागाने दहिसर येथील केतकीपाडा येथे छापा घालून १३४ लिटर गावठी दारू जप्त केली. या प्रकरणी त्यांनी वत्सला गाहिले (४५) या महिलेला अटक केली आहे. केतकीपाडा येथील झोपडीतून ती दारू विक्रीचा व्यवसाय करत होती. पथकाला २०० मिलिलिटरच्या सात प्लॅस्टिक बॅगांमध्ये ही दारू साठवून ठेवलेली आढळली. त्याची किंमत ९ हजार रुपये आहे. वत्सला गाहिले ही दारू २० रुपये प्रतिग्लास दराने विकायचे. ही दारू तपासण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहे.