पालकांकडून मुलांना रोजच्या खर्चासाठी किंवा महिन्याचा पॉकेटमनी म्हणून ठरावीक रक्कम दिली जाते. मात्र, या रकमेच्या खर्चाचे नियोजन मुलांकडून होत नाही. पालकांनाही आपल्या मुलांनी कशासाठी पैसे खर्च केले, हे समजू शकत नाही. पालकांना यावर नियंत्रण ठेवता येणाऱ्या यंत्रणेची गरज सध्या भासू लागली आहे. ही गरज स्लोंकिटच्या माध्यमातून पार पडणार आहे.

अनेक पालक मुलांचा महिनाभराचा खर्च भागविण्यासाठी त्यांना दरमहा एक ठरावीक रक्कम देत असतात. पण अनेकदा मुलं विविध कारणानिमित्त पैसे मागतात आणि नेमके आपण किती पैसे दिले व त्यांनी किती खर्च केला याचा तपशील पालकांकडे राहात नाही. मुलांचा हा अर्थव्यवहार नियोजनबद्ध व्हावा व त्या व्यवहाराचा तपशील पालकांनाही कळावा अशी यंत्रणा सध्या अस्तित्वात असली तरी ती खूप त्रोटक आहे. याचबरोबर एकाच गोष्टीसाठी अनेक अ‍ॅप्स डाऊनलोड करण्याची गरज भासते. पण आता ‘स्लोंकिट’मुळे सर्वसमाविष्ट अशी एकच यंत्रणा उपलब्ध झाली आहे.

जावेद तापिया हे दोन तरुण मुलींचे वडील. मुली म्हटल्या की वडिलांच्या त्या लाडाच्याच. यामुळे त्यांनी त्यांना दरमाह एक ठरावीक रक्कम दिल्यानंतरही त्या विविध कारणांनी त्यांच्याकडून पैसे मागू लागल्या. हे पैसे नेमके कुठे खर्च करतात याचा तपशील काही जावेद यांना नीटसा मिळत नव्हता. तसेच एका महिन्यात किती पैसे दिले हेही त्यांच्या लक्षात राहात नसे. मग हे नेमके असे काय होते याबाबत जावेद यांनी आपला मित्र मुरद नाथानी याच्याशी चर्चा केली. त्या वेळेस मुरद यांनाही त्यांच्या बाबतीत पण हेच घडत असल्याचे जाणवले. तेही त्यांच्या मुलांना खर्चाला पैसे देतात, मात्र त्याचा हिशोब मात्र नीटसा येत नसे. या वेळी बराच वेळ चर्चा झाल्यानंतर त्यांनी असे ठरविले की, मुलांना पैशाचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांना अर्थनियोजन करण्याची सवय लावली पाहिजे. ही सवय लावण्यासाठी काय करावे याचा विचार करत असताना त्यांच्या डोक्यात स्लोंकिटची संकल्पना रुजली. पण ही समस्या केवळ आपलीच आहे की इतरांनाही ती जाणवते यासाठी आम्ही बाजाराची पाहणी केली. यात आम्हाला असे लक्षात आले की, ही समस्या अनेकांची आहे. यातून स्लोंकिटची संकल्पना अधिक भक्कम झाली आणि यातूनच  http://www.slonkit.com/ चा जन्म झाला. याचे अ‍ॅपही विकसित करण्यात आले असून एका क्लिकवर आता मुल अर्थनियोजन करू शकत आहेत.

असे चालते काम

मुलांना अर्थपूर्ण नियोजनाचे धडे देण्यासाठी त्यांना त्यांच्या पद्धतीने समजावून सांगणे गरजेचे होते. यामुळे या स्लोंकिटमध्ये मुले त्यांना दिलेले पैसे त्यांच्या पद्धतीने खर्च करू शकतात, त्याचे नियोजन करू शकतात, इतकेच नव्हे तर आपल्या पालकांकडून नियोजनाचे मार्गदर्शनही घेऊ शकतात. या अ‍ॅपची रचना करताना ती मुख्यत्वे तीन भागांमध्ये करण्यात आली आहे. यातील पहिला भाग हा पालकांचा आहे. पालकांना आपल्या मुलांना रोज पैसे देणे किंवा दर आठवडय़ाला पैसे देणे अशा गोष्टी कराव्या लागतात. महिनाअखेर ही रक्कम किती झाली याचा अंदाज येत नाही. यामुळे पालकांना यावर नियंत्रण ठेवता येणाऱ्या यंत्रणेची गरज होती. ही गरज स्लोंकिटच्या माध्यमातून पार पडणार आहे. यात ते आपल्या मुलाच्या स्लोंकिट कार्डमध्ये एक ठरावीक रक्कम भरू शकणार आहेत. या रक्कमेत कशा प्रकारे नियोजन करता येईल याबाबत पालक त्यांना मार्गदर्शन करू शकणार आहेत. तर दुसरा भाग लहान मुलांसाठीचा आहे. यात विद्यार्थ्यांना महिन्याला एक रोख रक्कम मिळाली की, त्यांना त्यांचे खर्च भागविणे सोपे जाते असे त्यांना वाटते. यामुळे त्यांना पैसे कसे खर्च करावेत याबाबतही यामध्ये मार्गदर्शन करण्यात आले आहे. तिसरा भाग हा महाविद्यालयीन तरुणांसाठी आहे. यामध्ये तरुणांनाही मिळणाऱ्या पैशांचे नियोजन कशा पद्धतीने करायचे याबाबत मार्गदर्शन केले जाते. तसेच दर महिन्याल्या कोणत्या कारणासाठी किती पैसे खर्च केलेत याचा तपशीलही या तरुणांना उपलब्ध करून दिला जात असल्याचे मुरुड यांनी स्पष्ट केले. सध्या बाजारात अनेक मोबाइल वॉलेट्स उपलब्ध आहेत. पण त्यात अर्थनियोजनाचा कोणताही भाग उपलब्ध नाही. हा भाग आमच्या अ‍ॅपमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. यातून अर्थनियोजनात पालक व मुलं एकमेकांशी संवाद साधू शकणार आहेत, तर आपल्या खर्चाचे योग्य नियोजनही करू शकणार असल्याचे मुरड यांनी नमूद केले. याचबरोबर तरुणांना विविध ब्रॅण्ड्सच्या ऑफर्सही या अ‍ॅप्सच्या माध्यमातून उपलब करून दिल्या जात असल्याचेही ते म्हणाले.

नवउद्यमींना सल्ला

भारतात आजही अनेक सुविधांची कमतरता आहे. यामुळेच तरुण उद्योजक नवनवीन कल्पना घेऊ येत आहेत. नवउद्योग सुरू करत असताना तो उद्योग आणि ग्राहक या दोघांना फायद्याचा कसा असेल यावर विचार करणे आवश्यक आहे. तंत्राधारित नवउद्योगामुळे आपले जीवन अधिक सुखकर होणे शक्य झाले आहे. यामुळे अशा सुविधांना अधिक प्रतिसाद मिळत आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपण साकारलेली संकल्पना एका रात्रीत यशस्वी होईल आणि त्यातून चांगले उत्पन्न  मिळेल. यासाठी तुमच्याकडे संयम असणे आवश्यक असल्याचे मुरड यांनी नमूद केले. उद्योग करत असताना नेहमी एकच प्रश्न विचारात राहा तो म्हणजे आपल्या ग्राहकाला समाधान मिळते की नाही. याचे उत्तर सकारात्मक असेल तर आपला उद्योग यशस्वी होईल असे आपण म्हणू शकतो, असा सल्लाही मुरड यांनी दिला.

गुंतवणूक आणि उत्पन्नस्रोत

‘स्लोंकिट’ ही कंपनी सिएन्ना सिस्टीम्स र्सिोसेस प्रा. लि. या कंपनीच्या अंतर्गत काम करते. यामुळे सध्या या कंपनीला निधी उपलब्ध असला तरी भविष्यात निधी उभारणीचा विचार असल्याचे मुरड यांनी नमूद केले.

भविष्याचे नियोजन

भविष्यात आमचा ‘अर्थ’पूर्ण पिढी निर्माण करण्याचा मानस आहे. यात वित्तनियोजनाचे महत्त्व सांगण्यापासून त्यांना याबाबतचे ज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. यामुळे भविष्यात शैक्षणिक संस्था विद्यार्थी संघटना यांच्या माध्यमातून हा उपक्रम जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा मानस आहे. डिजिटल पेमेंट्सच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळवायचे असून यासाठी देशाच्या कोपऱ्यात आमची सेवा पुरविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मुरड यांनी सांगितले.

Niraj.pandit@expressindia.com

@nirajcpandit