हार्बर मार्गावरील लोकल गाडय़ांचे वेळापत्रक बिघडण्यासाठी कारणीभूत असणारी शिवडी आणि चुनाभट्टी येथील रेल्वे फाटके किमान गर्दीच्या वेळेपुरती बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही फाटके गर्दीच्या वेळी ठरावीक वेळेपेक्षा जास्त काळ उघडी राहत असल्यामुळे त्याचा परिणाम वाहतुकीवर होत होता. त्यामुळे दर दिवशी किमान २० सेवा रद्द करण्याची वेळही रेल्वे प्रशासनावर येत होती.
शिवडी आणि चुनाभट्टी येथे रेल्वेरूळ ओलांडण्यासाठी रेल्वे फाटके आहेत. या उपनगरांतील लोक, विद्यार्थी या फाटकांचा सातत्याने वापर करतात. मात्र गर्दीच्या वेळी, म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी हे फाटक तीन ते चार मिनिटांपेक्षा जास्त काळ उघडे राहते. त्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतुकीला मोठा फटका बसतो. त्यामुळे मंगळवारपासूनच ही दोन्ही फाटके सकाळी आणि संध्याकाळी बंद ठेवण्यात येणार आहेत.
शिवडी येथील फाटक दर सकाळी ७.४० ते १०.५० आणि संध्याकाळी ५.१० ते ८.२० या दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. तर चुनाभट्टी येथील फाटक सकाळी ७.२५ ते १०.३० आणि संध्याकाळी ५.१५ ते ८.३५ या वेळेत बंद ठेवण्यात येईल. यामुळे स्थानिक रहिवाशांना वाहतुकीच्या रस्त्यांत फेरबदल करावे लागतील. याची नोंद स्थानिक रहिवाशांनी घेण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे.
दिवा स्थानकाजवळील रेल्वे फाटकामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील तब्बल ५० ते ६० गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडते. या ठिकाणी पुल बांधला जावा, यासाठी रेल्वेने अनेकदा स्थानिक प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे.
मात्र त्याचा काहीच फायदा झालेला नाही. आता शिवडी आणि चुनाभट्टी या ठिकाणच्या रेल्वे फाटकांबाबत रेल्वेने कठोर निर्णय घेतला आहे. दिवा स्थानकातील आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वक्तशीर सेवा देण्यासाठी गर्दीच्या वेळेत रेल्वे फाटक बंद करायचा एकमेव तातडीचा पर्याय रेल्वे प्रशासनासमोर आहे.
मात्र या पर्यायामुळे दिव्यातील इतर लोकांना एका बाजुने दुसरीकडे जाण्यात अडचण येईल. त्यामुळे रेल्वे प्रशासनासमोर मोठा पेच आहे.