जुन्या नोटा भरण्याच्या शेवटच्या दिवशी नागरिकांची झुंबड

निश्चलनीकरणानंतर बँक आणि पोस्टाबाहेर लागणाऱ्या रांगांबरोबरच दररोज नवनवीन नियमांचा, बंधनांचा मारा करणाऱ्या ‘रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया’च्या परिपत्रकांचा अर्थ लावताना गेल्या ५० दिवसांत बँक अधिकारी व कर्मचारी वर्गाची चांगलीच दमछाक झाली. महत्त्वाचे म्हणजे बँकांतील रांगा कमी झाल्या तरी रिझव्‍‌र्ह बँकेकडून नव्या सूचनांचा मारा सुरूच असल्याने बँक कर्मचाऱ्यांची ही दमछाक सध्या तरी थांबण्याची सूतराम शक्यता नाही.

मुलुंड पूर्व येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखा प्रबंधक उमा कृष्णस्वामी म्हणाल्या, चलनबंदीनंतर विस्कटलेली बँकांची घडी आता सुरळीत होते आहे. बँकेचे दैनंदिन कामकाज सांभाळून सरकारच्या निर्णयाप्रमाणे जनतेला नोटा बदलून देणे, जमा करणे आदी कामे कर्मचारी करत होते. १९ नोव्हेंबपर्यंत उशिरा थांबून बँकेत काम करावे लागत होते. त्यात घरचे नियोजन मागे राहिले हे खरे आहे. परंतु नोटा बदलून देणे हे आमचे काम होते.’

‘बॅंक ऑफ महाराष्ट्र’च्या रजनी येरमे यांनी सांगितले की, ‘आमच्या बॅंकेत आम्ही सर्व महिला कर्मचारी आहेत. चलनबंदीच्या काळात आम्ही सर्वजण अर्धा-एक तास आधी येत होतो. सुरुवातीला तणाव वाटला. पण २४ नोव्हेंबरनंतर सुरळीत झाले. ग्राहकांच्या प्रत्येक प्रश्नाचे समाधान आम्ही करत होतो. त्यामुळे कसला वाद झाला नाही. मात्र या काळात आम्ही कुणी सुटय़ा घेतल्या नाहीत.’

‘नोटाबंदीच्या काळात आमच्या रजा रद्द करण्यात आल्या. कार्यालय सुरू होण्याआधीच ग्राहक बाहेर रांगा लावून असायचे. ३० नोव्हेंबरनंतर ही परिस्थिती बदलली. मात्र आता दोन हजारच्या नोटांचा प्रश्न उद्भवला आहे. या नोटा स्वीकारण्यास कुणी तयार नाही. त्यामुळे ग्राहकांना तोंड देताना नाकीनऊ येते. अजूनही रोज नवीन नियम येत आहेत. त्यामुळे हजारो प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात. त्यामुळे ही परिपत्रके आम्हाला काळजीपूर्वक समजून घ्यावी लागतात,’ असे ठाण्यातील एका पोस्ट कर्मचाऱ्याने सांगितले. त्याच वेळी, नोटाबंदीमुळे पोस्टाच्या खात्यांत तसेच व्यवहारांत वाढ झाल्याचेही त्यांनी नमूद केले.