14 December 2017

News Flash

अडचणींचे ढग दूर होतील

भारताच्या आर्थिक अवकाशावरील अडचणींचे मळभ आगामी वर्षांतही कायम राहील, पण हे काळे ढग दूर

व्यापार प्रतिनिधी , मुंबई | Updated: December 29, 2012 4:59 AM

भारताच्या आर्थिक अवकाशावरील अडचणींचे मळभ आगामी वर्षांतही कायम राहील, पण हे काळे ढग दूर सरत असल्याचेही दिसत असून, भरभराटीचा काळ पुन्हा उभारी घेईल, असा आशावाद देशातील आघाडीच्या उद्योगसमूहातील तब्बल अर्धशतकी कारकीर्द गाजविलेले आणि सध्याच्या घडीला जगातील एक प्रमुख उद्योगपती रतन टाटा यांनी कामगारांचा निरोप घेताना असा आशावादी सूर शुक्रवारी व्यक्त केला.
आजवर जपलेला साधेपणा आणि निरामयता तब्बल १०० अब्ज डॉलरच्या टाटा उद्योगसमूहाचे २१ वर्षे समर्थपणे सांभाळलेले अध्यक्षपद सोडतानाही रतन टाटा यांनी दाखविला. ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य असतानाही सोहळा-समारंभाला फाटा देत त्यांनी आपल्या सर्व सहकारी व कर्मचाऱ्यांना उद्देशून निरोपवजा पत्र लिहिण्याचा आणि आगामी काळासाठी बांधीलकी, पाठबळ व समर्पण वृत्तीची हाक देणारे भावपूर्ण आवाहन देणे पसंत केले.
‘आपल्या समूहाच्या भविष्यातील विकासपथाचे नेतृत्व आता सायरस मिस्त्री यांच्याकडे असेल. मला खात्री आहे की, माझ्या कारकिर्दीत मी तुमच्याकडून अनुभवलेले पाठबळ, बांधीलकी आणि समंजसपणा त्यांच्याबाबतीतही तुम्ही दाखवाल,’ अशा शब्दात रतन टाटा यांनी आपला वारसा नवनियुक्त अध्यक्ष  मिस्त्री यांच्या तरुण खांद्याला भारमान होणार नाही याचीही काळजी घेतली. काळ कितीही अडचणीचा व खाचखळग्यांनी भरलेला असला तरी ‘आपल्या संस्थापकांनी उद्योगसमूहाच्या उभारणीत आजवर जपलेली मूल्यव्यवस्था आणि नैतिक मापदंडाची कास कधीही सोडू नका,’ असेही टाटा यांनी आपल्या या पत्रात कर्मचाऱ्यांना बजावले. आगामी काळात ओसरता ग्राहक पाया, मागणीवर ताण आणि आयात मालाशी कडव्या स्पर्धेचे वातावरणही कायम राहील. त्यामुळे टाटा समूहातील कंपन्यांना नावीन्यपूर्ण व्यापार पद्धतींचा माग घ्यावा लागेल आणि खर्चाला कात्री लावावी लागेल, असा कानमंत्रही टाटा यांनी विविध कंपन्यांच्या प्रमुखांना दिला आहे.
कर्जावर मर्यादा ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केलेआहे.टाटा समूहाच्या सेवा आणि उत्पादनांचा व्याप जगभरात ८५ देशांमध्ये आहे आणि ही निश्चितच आपल्यासाठी गौरवास्पद बाब आहेच आणि खडतर आव्हानांना सामोरे जाण्याचे आत्मबळ देणारीही आहे. गेल्या २० वर्षांत आपल्या समूहाच्या प्राप्तीत २० पटीने वाढ झाली असून, यातील ५८ टक्के मिळकतही ही विदेशातून येत आहे. टाटा ब्रॅण्डने जगात ४५ व्या पायरीवर मजल मारली आहे तर देशातील ते क्रमांक एकची नाममुद्रा बनली असल्याचेही आवर्जून सांगताना त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीची चमकही त्यांनी स्पष्ट केली.     

First Published on December 29, 2012 4:59 am

Web Title: clouds of difficulty will pass