उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा

राज्यातील विद्यापीठांची स्वतंत्र वेळापत्रके, परीक्षा, प्रवेश यांच्या समन्वयातील अभाव यामुळे होणारे विद्यार्थ्यांचे हाल आता टळणार आहेत. नव्या विद्यापीठ कायद्यातील परिनियमांनुसार आता विद्यापीठांसाठी सामाईक वेळापत्रक करण्यात येणार असून, येत्या शैक्षणिक वर्षांपासून त्याची अंमलबजावणी करण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्याचे शालेय, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. त्याचप्रमाणे या शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या निवडणुका घेण्यात येणार असल्याचेही तावडे यावेळी म्हणाले.

विनोद तावडे यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला मंगळवारी भेट दिली. शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण यांमधील सध्या सुरू असलेल्या घडामोडी, नवे उपक्रम, गेल्या तीन वर्षांत विभागाने केलेली कामे यांची मांडणी त्यांनी यावेळी केली. शालेय शिक्षण विभागातील विविध योजना, नवा विद्यापीठ कायदा, स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठे, शुल्क नियमन अशा मुद्दय़ांवर तावडे यांनी संवाद साधला.

नव्या विद्यापीठ कायद्यानुसार आता राज्यातील सर्व विद्यापीठांसाठी सामाईक परिनियम करण्यात येणार आहेत. त्यानुसार विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष सुरू करणे, प्रवेश, परीक्षा, निवडणुका यांसाठीचे एकच वेळापत्रक करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्याचप्रमाणे येत्या शैक्षणिक वर्षांपासून राज्यात विद्यार्थ्यांच्या निवडणुकाही घेण्यात येणार असल्याची माहिती तावडे यांनी दिली.

तावडे म्हणाले, ‘प्रत्येक विद्यापीठाचे परिनियम आतापर्यंत वेगळे होते. आता ८० टक्के परिनियम हे सामाईक असतील तर २० टक्के परिनियम हे विद्यापीठ त्यांच्या स्थानिक गरजांनुसार निश्चित करू शकणार आहे. विद्यापीठांसाठी सामाईक वेळापत्रक करण्याचाही विचार आहे. कुलगुरूंच्या बैठकीमध्येही याबाबत चर्चा झाली. वेळापत्रक निश्चित असले की कुणाच्या निकालांना उशीर होतो, कुणाचे आधी होतात असे सगळे स्पष्ट होईल. शैक्षणिक गुणवत्तेला धक्का न लागता निकाल वेळेत जाहीर होणे, प्रवेशाचा समन्वय यासाठी काय करता येईल याबाबत विचार सुरू आहे.’

बंद पडणाऱ्या महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास

राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये विद्यार्थ्यांअभावी बंद पडत आहेत. त्याबाबत तावडे म्हणाले, ‘प्रत्येक शाखेनुसार महाविद्यालयांच्या प्रवेशात फरक पडत आहे. उदाहरणार्थ, माहिती तंत्रज्ञान या शाखेसाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी आहे. म्हणून या शाखेसाठी महाविद्यालयांनी घेतलेल्या शिक्षकांना काढून टाकणे योग्य नाही. अशा वेळी परिसरातील महाविद्यालयांनी एकत्र येऊन त्या शाखेसंबंधित विषयांमधील कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करणे शक्य आहे. त्याबाबत सध्या विचार सुरू आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांमागे कौशल्य विकास अभ्यासक्रमांसाठी केंद्र शासन दहा हजार रुपये देते. हे अभ्यासक्रम सुरू करता येणे शक्य आहे. त्याचप्रमाणे अभ्यासक्रमांची पुनर्रचना करण्याबाबतही अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला सुचवण्यात आले आहे.’

सध्या प्रत्येक विद्यापीठाचे स्वतंत्र वेळापत्रक आहे. त्यानुसार प्रवेशापासून परीक्षेपर्यंतची कामे विद्यापीठे त्यांच्या सोयीने करतात. एका विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष सुरू होते तेव्हा दुसऱ्या विद्यापीठाचे निकाल जाहीर होतात, तर तिसऱ्या विद्यापीठाच्या परीक्षाच सुरू असतात. शैक्षणिक वेळापत्रकात समन्वय नसल्यामुळे गोंधळ उडतो. सामाईक वेळापत्रकाच्या माध्यमातून हा गोंधळ टाळण्याची  योजना आहे.

– विनोद तावडे