सामायिक परीक्षेसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ हजारांची घट

यंदा अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी या अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक परीक्षेसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास ६ हजार अर्ज कमी आले आहेत.

अर्जाची घटलेली संख्या आणि औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांना गेल्या काही वर्षांपासून वाढलेला प्रतिसाद पाहता यंदाही अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी बिकटच वाट असण्याची शक्यता आहे.

अभियांत्रिकी अभ्यासक्रम महाविद्यालयांना विद्यार्थी शोधण्याची मोहीम यंदाही राबवावी लागण्याची शक्यता आहे. सामायिक प्रवेश परीक्षेसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अर्जाची संख्या घटली आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी या अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश परीक्षा होत आहे. गेल्या काही वर्षांपासून औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढतो आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांच्या ८० टक्क्यांहून अधिक जागांवरील प्रवेश गेल्या वर्षी झाले आहेत.

झाले काय?

सामायिक प्रवेश परीक्षेसाठी ४ लाख २२ हजार ४२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी या परीक्षेसाठी ४ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी प्रत्यक्ष परीक्षेला बसणे, त्यात उत्तीर्ण होणे, बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणे अशा प्रत्येक टप्प्यांवर विद्यार्थ्यांची गळती होते. राष्ट्रीय संस्थांमध्ये अनेक विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यामुळे यंदाही अभियांत्रिकी महाविद्यालयांना मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटणार असल्याचे दिसत आहे.