मुंबई : महाराष्ट्राला केंद्र सरकार कडून लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने अनेक केंद्रे बंद पडली असल्याने प्रदेश काँग्रेसने या केंद्रांबाहेर थाळीनाद व घंटानाद आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करणार असल्याचे जाहीर केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ साजरा करण्याचे आवाहन केले आहे. मात्र राज्यातील बहुतांश लसीकरण केंद्रे लस पुरवठ्याअभावी बंद असताना ‘महोत्सव’ कसा होऊ शकतो, असा सवाल असा  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी के ला आहे.  संपूर्ण राज्यात करोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. तो रोखण्यासाठी सध्यातरी लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. केंद्र सरकारकडून राज्याला पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा होत नसल्याने अनेक जिल्ह्यातील  लसीकरण केंद्रे बंद आहेत. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राला पुरेशी लस पुरवण्याऐवजी पाकिस्तानसह जगभरातील अनेक देशांना मोफत लस पुरवत आहेत. गुजरातसारख्या भाजपशासित राज्यांना महाराष्ट्रापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात लसीचा पुरवठा केला जात आहे. केंद्र सरकार लसीच्या वाटपातही राजकारण आणि दुजाभाव करत आहे, असा आरोप पटोले यांनी केला आहे.