संविधानातील मूलभूत तत्त्वांना भाजपचा सुरुंग – थोरात

मुंबई : काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त शनिवारी, २८ डिसेंबर रोजी ऑगस्ट क्रांती मैदानापासून गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापर्यंत ‘संविधान बचाव, देश बचाव’ ध्वज संचलन मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रातील भाजप सरकारने संविधानातील मूलभूत तत्त्वांनाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न चालविला आहे, अशी टीका त्यांनी केली.

काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात धर्मभेद, वंशभेद, प्रांतभेदावर मात करणारी राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे हे सूत्र ठरवण्यात आले. याच सूत्रावर काम करीत काँग्रेसने स्वातंत्र्य चळवळ उभी केली. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली अहिंसक  मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली देशाचे संविधान तयार झाले. या संविधानानुसार आपला देश चालतो आहे; पण आज केंद्रातील भाजप सरकारच्या लोकशाहीविरोधी व संविधानविरोधी कार्यपद्धतीने देशात धार्मिक  व सामाजिक  फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी या देशात ‘फोडा आणि राज्य करा’ हे धोरण राबवले होते. केंद्रातील भाजपचे सरकार त्याच नीतीचा वापर करीत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा स्वातंत्र्यालढय़ाप्रमाणे भाजप सरकारच्या विरोधात लढा उभारावा लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने शनिवार, २८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता ऑगस्ट क्रांती मैदान येथे ध्वजारोहण करून तेथून गिरगाव चौपाटीपर्यंत ‘भारत बचाओ संविधान बचाओ’ ध्वज संचलन मोर्चा काढण्यात येणार आहे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी मोठय़ा संख्येने या मार्चमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.