कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर या दोन्ही महापालिका निवडणुकांमध्ये गतवेळच्या तुलनेत राष्ट्रवादीची पीछेहाट झाली असताना, कोल्हापूरमुळे काँग्रेसची पराभवाची मालिका खंडित झाली आहे. जिल्हा परिषदेपाठोपाठ नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये विदर्भात काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे भाजपसाठी हा धोक्याचा इशारा मानला जातो.
कल्याण-डोंबिवलीमध्ये राष्ट्रवादीचे संख्याबळ १४ वरून दोनपर्यंत घटले आहे. काँग्रेसची अवस्था फार काही चांगली नाही. याआधी १५ सदस्य होते, ते संख्याबळ आता चारवर आले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असतानाही दोन्ही काँग्रेस कल्याण-डोंबिवलीमध्ये पार नेस्तनाबूत झाले. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीची सदस्य-संख्या २७ वरून १५ पर्यंत कमी झाली आहे. कोल्हापूरमध्ये माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यामुळे काँग्रेसला यश मिळाले. कोल्हापूरमध्ये पाटील यांनी काँग्रेसची एकहाती सूत्रे घेऊन पक्षाला यश मिळवून दिले.
गेल्या वर्षभरात झालेल्या विविध निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला नवी मुंबईत यश मिळाले होते. भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेस तर गोंदिया जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. पालघर जिल्हा परिषद किंवा काही छोटय़ा नगरपालिका वगळता भाजपला मोठय़ा कोणत्याच पालिकेत सत्ता मिळालेली नाही. सर्व मोठय़ा पालिकांमध्ये भाजपच्या पराभवाची मालिकाच सुरू झाली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत विदर्भात भाजपला घवघवीत यश मिळाले होते; पण भंडारा जिल्हा परिषदेत सत्ता असूनही भाजपचा पराभव झाला. गोंदियामध्येही भाजप मागे पडला. आज निकाल लागलेल्या नगर पंचायतीच्या निवडणुकीत विदर्भात काँग्रेसने भाजपपेक्षा जास्त यश मिळविले आहे. मुख्यमंत्री, अर्थ, ऊर्जा यांसारखी महत्त्वाची खाती विदर्भाकडे असली तरी भाजपला लोकसभा आणि विधानसभेचे यशाची कमान राखणे शक्य झालेले नाही. विदर्भात भाजपला लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये धक्का बसणे पक्षाकरिता चिंतेची बाब आहे.
कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर तसेच नगर पंचायतींच्या निकालावरून आजचा कौल हा भाजप सरकारच्या विरोधात असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. कोल्हापूरमध्ये सत्तेसाठी राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याची तयारी काँग्रेसने दर्शविली आहे.