मुंबई : रिमझिम पाऊस आणि रविवारची सुट्टी एकत्र आल्याने बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांची प्रचंड झुंबड उडाली. सहा हजारांहून अधिक पर्यटक, हजार गाडय़ा, तेवढय़ाच दुचाकी यांनी उद्यानात प्रवेश केल्यानंतर सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला. त्यामुळे रविवारी दुपारी प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत राष्ट्रीय उद्यानातील प्रवेशांवर बंदी आणण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे नसली तरी यानंतर चार हजार पर्यटकांच्या संख्येपर्यंतच नियंत्रण घालण्यात यावे याचा विचार सुरू झाला आहे.
पावसात धम्माल करण्यासाठी मुंबईचा संपूर्ण पश्चिम किनारा, गेट वे ऑफ इंडिया, उद्याने, हॉटेल येथे पर्यटकांची गर्दी उसळणे ही तशी सामान्य घटना. बोरीवलीच्या हिरव्यागार उद्यानात धबधब्याखाली भिजण्याचा व नदीच्या पात्रात डुंबण्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक जातात. त्यातच रविवारची सुट्टी आल्याने पर्यटकांच्या संख्येत कैक पटींनी वाढ होते. दरवर्षीचा हा अनुभव लक्षात घेता उद्यानातील सुरक्षागटही कार्यरत होतात. मात्र तरीही रविवारी पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली. सहा हजार पर्यटक, ९८० चारचाकी गाडय़ा व ९०० बाइक उद्यानात आल्या. संपूर्ण उद्यानाची सुरक्षा वनविभाग व पोलिसांच्या दोन गटांमधील १८ रक्षकांकडून केली जाते. पावसाळ्यात गटांची व सुरक्षारक्षकांची संख्या दुप्पट केली जाते. तरीही एवढय़ा पर्यटकांसाठी ३६ रक्षक अपुरे पडतात. त्यातच पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे आपत्ती ओढवल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. याचा अंदाज घेऊन पर्यटकांना प्रवेशबंदी केली जाते.
पर्यटकांची संख्या किती मर्यादेत असावी याबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्त्व नाहीत. मात्र गर्दी, पावसाचा अंदाज, नदीच्या पात्राचा अंदाज आदी बाबी लक्षात घेऊन प्रवेशद्वार बंद केले जाते. मात्र यानंतर पर्यटकांची संख्या चार हजारांवर ठेवण्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत, अशी माहिती रेंज ऑफिसर राजेंद्र पवार यांनी दिली.