मुंबई : करोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणेच तिसऱ्या लाटेचा धोकाही दाटीवाटीची वस्ती, झोपडपट्टी येथे अधिक असल्याचा अंदाज कृतिदलाने वर्तवला आहे. बालकांमध्ये तिसऱ्या लाटेचा धोका अधिक असल्याची चर्चा असताना २० ते ४० वयोगटातील नागरिक बाधित होण्याची अधिक शक्यता असल्याचे सदस्यांनी सांगितले.

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने राज्यात काय तयारी करायला हवी, याची चर्चा करण्यासाठी बुधवारी मुख्यमंत्र्यांबरोबर करोना कृतिदलाची बैठक आयोजित केली होती. झोपडपट्टीवासीयांमध्ये पहिल्या लाटेनंतर आलेली करोनाविरुद्धची प्रतिकारशक्ती(प्रतिपिंडांचे प्रमाण) आता कमी होण्याची शक्यता असून या वर्गात लसीकरणाचे प्रमाणही कमी असल्यामुळे तिसऱ्या लाटेत झोपडपट्टी भागांत अधिक उद्रेक होण्याची शक्यता सदस्यांनी वर्तवली आहे.

‘पहिल्या लाटेत धारावीत करोनाचा उद्रेक झाला, दुसऱ्या लाटेत मात्र संसर्गाचे प्रमाण तुलनेने फारच कमी होते. सेरो सर्वेक्षणातून या भागांमधील प्रतिपिडांचे प्रमाण लक्षात येऊ शकेल. त्यामुळे या भागात लसीकरण वाढवणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे बालकांमध्ये तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे आम्हाला वाटत नाही. याउलट २० ते ४० वयोगटामध्ये अधिकजण तिसऱ्या लाटेत बाधित होण्याची शक्यता आहे,’ असे कृतिदलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

‘तिसऱ्या लाटेमधील बाधित होणाऱ्या व्यक्तींची संख्याही पहिल्या लाटेइतकीच किंवा त्याहून थोडी अधिक असेल. सक्रिय रुग्णांची संख्या आठ लाखांवर पोहोचेल असे वाटत नाही. जितक्या उशीरा लाट येईल तितकी बाधितांची संख्या कमी असेल आणि जितक्या लवकर लाट येईल तितकी बाधितांची संख्या अधिक असेल. त्यामुळे तीन महिन्यांच्या आत तिसरी लाट येऊ न देणे महत्त्वाचे आहे,’ असे मत डॉ. जोशी यांनी व्यक्त केले.

 

‘नेमका कालावधी सांगितलेला नाही…’

‘दोन लाटांमध्ये  १०० ते १२० दिवसांचे अंतर असते, असा अंदाज  गणिती प्रारुपांनी वर्तवला आहे. परंतु  अमेरिकेत दोन लाटांमध्ये १४ ते १५ आठवड्यांचे अंतर होते, परंतु ब्रिटनमध्ये आठ आठवड्यांपेक्षाही कमी काळातच तिसरी लाट आली. त्यामुळे  अंदाज वर्तवणे कठीण आहे.  ही लाट दोन ते चार आठवड्यात येईल असे कृतिदलाने सांगितलेले नाही,’ असे  सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.