-शैलजा तिवले

मुंबई : करोना रुग्णांचे लवकरात लवकर निदान करण्यासाठी आता पालिका खासगी प्रयोगशाळांमार्फतही प्रतिजन (अ‍ॅण्टीजेन) चाचण्या करून घेणार आहे. यासाठी इच्छुक प्रयोगशाळांना दर ही प्रस्तावित करण्याच्या सूचना पालिकेने केल्या आहेत.

आरटीपीसीआर पद्धतीने चाचण्या करण्यास तीन ते चार तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे अहवाल २४ तासांनी येतात. त्या तुलनेत प्रतिजन चाचणीमध्ये अर्ध्या तासात करोनाचे निदान होते. आरटीपीसीआरच्या चाचणीस खासगी प्रयोगशाळांना २५०० रुपये दर आहे. प्रतिजन चाचणी संचाची किंमत ४५० रुपये आहे. त्यामुळे तुलनेने ही चाचणी कमी खर्चिक देखील आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने या चाचण्या करण्याचे पालिकेने ठरविले आहे. यासाठी एक लाख संचही पालिकेने उपलब्ध केले आहेत. अधिक क्षमतेने करण्यासाठी आता खासगी प्रयोगशाळांची मदत घेण्यात येणार आहे.

पालिकेसोबत सध्या १७ खासगी प्रयोगशाळा काम करत आहेत. यातील प्रतिजन चाचणी करू इच्छिणाऱ्या आणि आयसीएमआरची परवानगी असणाऱ्या प्रयोगशाळांना प्रस्ताव सादर कऱण्यास सांगितले आहे. संचाची किंमत ४५० रुपये असली तरी चाचणी दर ठरवावे लागणार आहेत. सर्वात कमी दर प्रस्तावित करणाऱ्या प्रयोगशाळेची निवड दिली जाईल.

प्रतिजन चाचणीतून विलगीकरणातील १० टक्के असंशियतांचे निदान

शहरातील सर्व विलगीकरण केंद्रामध्ये असलेल्या रुग्णांच्या प्रतिजन चाचण्या गेल्या आठवडाभरात केल्या गेल्या. यातून जवळपास १० टक्के रुग्णांचे निदान केले असून त्यांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे यांच्यातील असंशयितांचे निदान करणे सोपे झाले. चाचणी नकारात्मक आलेल्यांच्या विलगीकरण केंद्रातून सोडण्यापूर्वी लक्षणे असल्यास आरटीपीसीआर चाचणी केली जाईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.