18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

पालिका झाली उदार!

स्थायी समितीने प्रशासनाकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास मंजुरी देऊन दिवाळीनिमित्त नगरसेवकांना लॅपटॉप भेट दिला.

प्रतिनिधी, मुंबई | Updated: November 13, 2012 5:57 AM

स्थायी समितीने प्रशासनाकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास मंजुरी देऊन दिवाळीनिमित्त नगरसेवकांना लॅपटॉप भेट दिला. लॅपटॉपची मागणी मान्य झाल्याबरोबर महापालिका मुख्यालयात वायफाय यंत्रणाही बसवण्याची मागणी नगरसेवकानी केली.
२००७ मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांना लॅपटॉप देण्यात आले होते. मात्र, त्यापैकी किती नगरसेवकांनी महापालिकेच्या कामासाठी त्याचा वापर केला हा मुद्दा गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे यावेळी लॅपटॉप देताना नगरसेवकांना त्याबाबतचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
तसेच, समित्या आणि सभागृहाच्या कामकाजाच्या कार्यक्रम पत्रिका लॅपटॉपवर उपलब्ध करून कार्यालयीन कामकाज ‘पेपरलेस’ करण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे. २३२ नगरसेवकांना लॅपटॉप आणि प्रशिक्षण देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीच्या सोमवारच्या बैठकीत हिरवा कंदिल दाखवण्यात आला. लॅपटॉपपोटी पालिकेच्या तिजोरीतील ७ कोटी ६७ लाख १२ हजार रुपये खर्च होणार आहेत.
लॅपटॉपसोबत इंटरनेट कनेक्शन आणि पालिका मुख्यालयात वायफाय यंत्रणा उभारावी, अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली. लॅपटॉपच्या हाताळणीचे ज्ञान काही नगरसेवकांना देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा, हे लॅपटॉप त्यांच्या घरी धूळ खात पडतील आणि पालिकेचे पैसे वाया जातील, असा मुद्दाही काही नगरसेवकांनी उपस्थित केला.
महापालिका मुख्यालयात वायफाय यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत आणि त्याच्या सुरक्षिततेबाबत माहिती-तंत्रज्ञान विभागाशी सल्लामसलत करून लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांनी
दिली.    

‘लॅपटॉपसोबत अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलही मिळाला असता तर ..’
अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलचा प्रस्ताव मंजूर होऊनही अद्याप ते न मिळाल्यामुळे नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. लॅपटॉपसोबत अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलही मिळाला असता तर अधिक बरे वाटले असते, अशी प्रतिक्रिया काही नगरसेवकांनी व्यक्त केली.

First Published on November 13, 2012 5:57 am

Web Title: corporation free hand for corporator distribute laptop corporation laptop
टॅग Corporator