भाजपचे नगरसेवक विनोद शेलार यांनी आपला विनयभंग केला असून जीवे मारण्याची धमकीही दिली आहे, अशी तक्रार एका महिलेने दाखल केल्यानंतर विनोद शेलार यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेलार नगरसेवक असलेल्या एका विभागातील एका जागेवर त्यांनी ड्रेनेजचे काम केले होते. मात्र ही जागा तक्रारदार महिलेची असल्याने त्यांच्यात वाद होता. या वादातून घडलेल्या प्रकारानंतर जुलै महिन्यात महिलेने तक्रार केली होती. चार महिने तपास केल्यानंतर पोलिसांनी अखेर १३ नोव्हेंबर रोजी शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १५चे नगरसेवक असलेल्या विनोद शेलार यांच्याच प्रभागात एक जागा आहे. या जागेवर शेलार यांनी त्यांच्या दोन साथीदारांसह कोणाचीही परवानगी न घेता ड्रेनेजचे बांधकाम केले होते. मात्र ही जागा तक्रारदार महिलेची आहे. ही महिला व्यवसायाने विकासक आहे. या महिलेने सदर बांधकामाबद्दल शेलार यांना जाब विचारला असला त्यांनी व त्यांच्या साथीदारांनी महिलेला शिवीगाळ केली व तिचा विनयभंग केला. तसेच त्यांनी जीवे ठार मारण्याची धमकीही दिली होती.
जुलैच्या सुमारास झालेल्या या प्रकारानंतर या महिलेने दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र पोलिसांना तातडीने गुन्हा दाखल न करता तपासाअंती १३ नोव्हेंबरला शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. अद्याप कोणालाही अटक झाली नसून पुढील तपास चालू असल्याचे दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत सुर्वे यांनी सांगितले. विनोद शेलार भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांचे बंधू आहेत.