25 February 2020

News Flash

खाऊखुशाल : केक : एक नव्हे अनेक..

बोरिवलीतील ‘कपकेक अफेअर’ या फक्त कपकेक मिळणाऱ्या शॉपची दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे.

कपकेक अफेअर

केक कापण्यासाठी किंवा खाण्यासाठी आता फक्त वाढदिवस हे निमित्त राहिलेलं नाही. आनंदाचे अनेक क्षण साजरे करताना ज्या आवडत्या गोड खाद्यपदार्थाना पसंती दिली जाते, त्यामध्ये केक सर्वात वरच्या स्थानी विराजमान आहे. केक खाण्याची आपली निमित्ते ज्याप्रमाणे बदलली त्याप्रमाणे केकही बदलताना दिसत आहे. प्रत्येक वेळी मोठा केक आणणं अनेक कारणांसाठी परवडत नाही. त्याला पर्याय म्हणून पेस्ट्रीजला पसंती मिळायला लागली. विविध फ्लेवर्स, लहान आकार आणि बजेटमध्ये बसणाऱ्या या पेस्ट्रीज लोकांना खूप आवडतात. परंतु, आता खवय्यांना आणि विशेषत: तरुण मंडळींना आकर्षण वाटू लागलंय ते कपकेकचं. कपकेक हा काही नवीन प्रकार नाही. कारण त्याच्या इतिहासात डोकावलं तर थेट सतरावं शतक गाठावं लागतं. जगभरात कपकेकला खाण्याच्या पदार्थामध्ये वेगळं वलय आहे. आपल्याकडे तर त्याच्याकडे श्रीमंतांचे चोचले म्हणूनच पाहिलं जातं. पण अस्सल खवय्यांनी हा भेदभाव करता कामा नये. म्हणूनच बोरिवलीतील ‘कपकेक अफेअर’ या फक्त कपकेक मिळणाऱ्या शॉपची दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे.

शेफ सिमॉन २०१५ पासून कपकेकमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहे आणि लोकांना कपकेकच्या प्रेमात पडायला भाग पाडतेय. पण पूर्वी केवळ ऑनलाइन ऑर्डर करता येऊ  शकणाऱ्या कपकेकला आता सिमॉनने मार्च २०१७ पासून हक्काचं ठिकाण मिळवून दिलंय. मागच्या बाजूला किचन आणि पुढील भागात शॉप असणाऱ्या छोटेखानी पण अतिशय आकर्षक अशा कपकेकच्या राज्यात पाऊल टाकताच समोरील काचेच्या मांडणीत ऐटीत विराजमान झालेले कपकेक तुमचं लक्ष्य वेधून घेतात. साधारणपणे एकाच आकाराचे पण त्यांच्या फ्लेवर्सप्रमाणे डिझाईन केलेले आणि अतिशय बारकाईने सजविलेले कपकेक पाहून यातला कुठला घेऊ  आणि कुठला नको हा संभ्रम तुमच्या मनात निर्माण होतो. प्रत्येक फ्लेवर्सप्रमाणे त्याची रंगसंगती, डिझाईन, आकार, एवढंच काय तर त्याला साजेसा कपचा पेपरही ठरवून निवडल्याचं दिसतं. त्यामुळे आपल्याला कुठला फ्लेवर खायचा आहे, हे आपण ठरवून गेलेलो असलो तरी समोरील प्रत्येक कपकेक तुम्हाला आकर्षित करत असतो. कपकेक म्हणजे दिसायला रटाळ असलेले मावा केक (चवीला उत्तम असले तरी) असा समज झालेल्या आपल्या सामान्य बुद्धीला कपकेक अफेअरमधील विविधता मात्र अचंबित करते. आणि त्याहीपुढे जाऊन त्याचा आस्वाद घेतल्यानंतर कपकेकबाबतची आपल्या मनातील प्रतिमाच बदलून जाते. कारण इथले कपकेक हे तुम्ही चमच्याच्या साहाय्याने खाऊ  शकता, इतके सॉफ्ट आणि डिलिशिअस आहेत. म्हणूनच शॉप उघडल्यानंतर अवघ्या दोन-तीन तासांमध्येच पॉप्युलर फ्लेवर्स अक्षरश: संपून जातात.

कपकेकचे तब्बल पंचवीसहून अधिक पर्याय येथे उपलब्ध आहेत. चॉकलेट फरेरो, चॉकलेट रोस्टेड आलमण्ड, चॉकलेट हेझलनट, चॉकलेट तिरामिसू, चॉकलेट आणि सॉल्टेड कॅरमल, चोको-ओरिओ, चोको चिप्स, रेड वेलवेट, रेड वेलवेट विथ चॉकलेट, व्हॅनिला, ब्लूबेरी आणि व्हाइट चॉकलेट, व्हॅनिला ब्लूबेरी आणि क्रीम चीज, ब्लूबेरी बटरक्रीम, स्ट्रॉबेरी बटरक्रीम, चॉकलेट बटरक्रीम, झेल्टी लेमन आणि ब्लूबेरी, मिल्क चॉकलेट नटेला ड्रिझल, व्हॅनिला ब्लूबेरी पायनॅप्पल, चॉकलेट एम अँन्ड एम अँन्ड नटेला, रेम्बो कपकेक विथ जॅम फीलिंग अँन्ड क्रीम चीज/बटरक्रीम, चॉक माल्तेसर, चॉकलेट फरेरो, लव स्ट्रक, फ्रूट एक्स्ट्राव्हेंजा, चॉक-क्रीम चीज पॉपकॉर्न अँड सॉल्टेड कॅरमल अशा नानाविध व्हरायटींची यादी न संपणारी आहे. यासोबतच चॉकलेट मूझ, गूई चॉकलेट केक, जार्स, टी केक्स, बनाना केक आणि ब्राऊनीजही आहेत. त्याशिवाय ४८ तास आधी ऑर्डर दिल्यास तुमच्या आवडीच्या फ्लेवर्सचे कपकेकही तयार करून मिळतात. रेग्युलर कपकेकच्या किमती ६५ आणि ८५ रुपये अशा आहेत. ऑर्डरनुसार तयार करून मिळणाऱ्या मिनी कपकेकच्या किमती फ्लेवर्सप्रमाणे २० ते २५ रुपये आहेत.

सिमॉन स्वत: शेफ असल्याने त्यांना खवय्यांना नेमकं काय आवडतं याची उत्तम जाण आहे. त्यामुळे सिझन, सण-उत्सव आणि कार्यक्रमांनुसार त्या नवनवीन फ्लेवर्सवर काम करत असतात. शॉपमध्ये दोन-चार माणसांच्या पलीकडे बसण्याची व्यवस्था नसली तरी सॉफ्ट, चॉकलेटी, क्रीमी आणि फ्रूटी कपकेकची मजा तिथे उभं राहून खाण्यातच अधिक आहे. अंडे न खाणाऱ्यांसाठी एगलेस कपकेकचेही पर्याय येथे उपलब्ध आहेत. त्यामुळे नेहमीच्या केक आणि पेस्ट्रीजपेक्षा वेगळ्या फॉर्ममधील केकचा आस्वाद घ्यायचा असेल आणि कपकेकला इतकं ग्लॅमर का आहे हे अनुभवायचं असेल तर एकदा तरी या लफडय़ात पडायला हरकत नाही.

कपकेक अफेअर

  • कुठे – शीतल बिल्डिंग, शॉप नं. २, शांती आश्रम बस डेपोच्या मागे, एलआयसी कॉलनी, बोरिवली (पश्चिम)
  • कधी – सोमवार ते रविवार संध्याकाळी ४.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत.

@nprashant

First Published on May 20, 2017 2:28 am

Web Title: cupcake affair borivali
Next Stories
1 पेट टॉक : प्राणीदेखरेख अ‍ॅपवर
2 मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना शिवसेनेचा विरोध
3 ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील पेपरफुटी रोखण्यासाठी समितीची स्थापना
Just Now!
X